चिपळूण : शहरातील शिवनदी पुलावर रस्त्यातच नदीतील गाळ व खडी टाकून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, “कोणाच्या जीवाशी खेळायची वाट पाहत आहात का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या पुलावर गेली अनेक वर्षे विद्युत व्यवस्थेचा अभाव असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी व गाळ टाकून ठेवण्यात आला असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काल रात्री असाच एक प्रकार घडला. पाटबंधारे (जलसंपदा) विभागामार्फत नदीतील काढलेला गाळ पुलाच्या वरच्या भागात ढिगाऱ्याच्या स्वरूपात ठेवण्यात आल्याने अंधारात तो न दिसल्यामुळे अपघात होण्याची वेळ आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एका दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख श्री. संजय रेडीज यांच्या बाबतीत घडल्याचे समजते. घटनेनंतर शिवसेना शहर सचिव श्री. प्रशांत मुळये यांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या डेप्युटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना गाळ बाजूला करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. मात्र, वारंवार तक्रारी करूनही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “अशा निष्काळजीपणामुळे एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत, संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
शिवनदी पुलावर गाळ-खडीचा ढीग; मोठा अनर्थ टळला, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
RELATED ARTICLES



