चिपळूण (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील पाग येथील श्रीकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक विक्रांत लवेकर, सौ. कांचन शिंदे, नगर पालिकेचे उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, नगरसेवक फैसल कासकर, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, सचिन खरे, रमण डांगे, श्री. पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष मोहन मिरगल यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. अंगणवाडीपासून संस्कारवर्गांपर्यंत विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण डांगे यांनी केले. कार्यक्रमात अलंकार आर्या चितळे व तिच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘पुष्पांजली’ या कथक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. तसेच कलारत्न ग्रुप निर्मित ‘कलांकन स्टुडिओ २३’चे हर्षद चव्हाण आणि स्टेफर्स ग्रुपचे महेश पवार यांनी सादर केलेल्या नृत्य शृंखलेलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रविवारी ३ मे रोजी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली.




