चिपळूण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवराय , छत्रपती शंभूराजे यांच्या नंतर शत्रुंचे स्वराज्यावरील आक्रमण रोखताना व विस्तार करताना पेशवाईच्या काळात वैयक्तिक हित बाजूला ठेवले . यामुळे पेशवाईचा सुवर्णकाळ हा मराठेशाहीचा सुवर्ण काळ असल्याचे राष्ट्रीय कीर्तनकार , विद्यावाचस्पती ह.भ.प श्री. चारूदत्तबुवा आफळे यांनी सांगितले. श्री स्वामी चैतन्य परिवार चिपळूण आयोजित दशकपूर्ती कीर्तनमालेतील ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ आख्यानातील पहिल्या दिवशीचे कीर्तन पुष्प उलगडताना आफळेबुवां यांनी माहित नसलेल्या इतिहासाची दाखले दिले. कीर्तनमाला शुभारंभ प्रसंगी उद्घाटक श्री. धनंजय चितळे यांनी लोकांना पचेल असे द्यावे. प्रेमाची भाषा लोकांना लवकर कळते.” असं विवेकानंद म्हणत असत .असे नमूद करताना माहित नसलेला इतिहास समजून घेण्यासाठी आफळेबुवां यांच्या कीर्तन श्रवणाचा व अभ्यासाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री स्वामी चैतन्य परिवार गेले दहा वर्ष चिपळूण येथे राष्ट्रीय कीर्तनकार , विद्यावाचस्पती ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करीत आहे. दशकपूर्ती कीर्तनमालेचे उदघाटन प्रसंगी संगीत संयोजक श्री. कमलेश भडकमकर यांची उपस्थिती होती . दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कीर्तनमाला शुभारंभाची सुरुवात झाली. उदघाटन कार्यक्रमात सहकलावंत मिलिंद तायवाडे ( तबला ) , मनोज भांडवलकर ( पखवाज) , चिंतामणी निमकर ( ऑर्गन) , वरद केळकर (सहगायक) आणि वज्रांग आफळे व संकेत भोळे (तालवाद्य ) यांच्या सह संगीतकार श्कमलेश भडकमकर व प्रवचनकार आणि उद्घाटक धनंजय चितळे यांचा आयोजकांचे वतीने सन्मान करण्यात आला. आफळेबुवां यांनी पेशवाईचा सुवर्णकाळ कीर्तन आख्यानाचे पहिल्या दिवसाचे पुष्पात सुरुवात करताना संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग” आपुलिया हिता असे जो जागता|धन्य माता पिता तयाचिया|| हा अभंग बुवानी निरूपणासाठी घेतला होता. बोलण्याच्या ओघात आजचे दिनविशेष ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊमाता व श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती या दोन्ही गोष्टींचा उल्लेख बुवांनी पूर्वरंगात केला व त्या अनुषंगाने त्यांच्याच चरित्रातील दृष्टांत देऊन पूर्वरंग रंगविला. आपुलिया हिता या शब्दावरती निरूपण करताना हित म्हणजे काय व आपले हित कशात आहे हे सांगताना अर्जुनाचे उदाहरण दिले.कोणतेही काम करताना व्यक्तिगत धर्म व व्यापकाचा धर्म या गोष्टींचा उलगडा अनेक उदाहरणे देऊन छान केला त्यात अनुषंगाने” कृष्ण माझी माता” हा अभंग बुवांनी सादर केला. चिपळूण येथील कलावंत वरद केळकर यांनी तो छान गायला. धर्मस्थापनेचा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या पूर्वी त्यांच्या पूर्वजांनीही केला होता. पण त्याला यश जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या शिवबांच्या हस्ते आले. आपल्या परंपरा , आपली वेशभूषा याविषयी बुवांनी छान भाष्य केलेआणि जबाबदार माता – पिता व्हायचे असेल तर मुलांबरोबर वेळ हा दिलाच पाहिजे असेही सांगितले. स्वामी विवेकानंदांचे विषयी बोलताना रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या बद्दल छान माहिती दिली. समाधी सुखाचा आनंद अपेक्षित करणाऱ्या विवेकानंदांना देशहितासाठी कार्य करण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंसांनी दिला होता . हिंदू धर्माचा ऱ्हास हा व्यापकहीत व व्यक्तिगतहीत हे न कळल्याने झाला हे पूर्वरंगाची समाप्ती करताना बुवांनी नमूद केले. उत्तररंगाला सुरुवात करताना बुवांनी हिंदू धर्माच्या ऱ्हासाची कारणे मांडली . छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याच्या मनावरती जे बिंबवले ते म्हणजे युद्ध . ते राजासाठी करायचे नसून देशासाठी करावे असे आहे आणि या विचारामुळेच १६८० साली शिवाजी महाराजांच्या झालेल्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाला २७ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून मराठी साम्राज्याला धक्का लावता आला नाही . म्हणजेच व्यापकहीत आणि स्वतःचे हित कशात आहे हे लोकांना कळले. त्यानंतरचा इतिहास मांडताना छत्रपती राजाराम महाराजांचा पुत्र शाहू व शंभू राजांचा पुत्र शाहू या दोघांमध्ये मोगलांनी भांडण लावण्याचा कसा प्रयत्न केला व तो कसा अयशस्वी झाला तेही सांगितले आणि त्याच वेळी खेळ मांडीयेला …. वरद केळकर यांनी छान सादर केले. बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातून पुण्याला गेलेले धनाजी जाधव यांच्या परिचयातील. त्याना पुण्याचा कारभार पाहण्यासाठी नेमले गेले यावेळचे इतिहासातले अनेक संदर्भ बुवांनी दिले . त्यात साताऱ्याला शाहू महाराजांचा राज्याभिषेक व कान्होजी आंग्रे यांच्याशी तहाला जाण्यासाठी बाळाजींची नेमणूक व त्यासाठी बाळाजीना हंगामी पेशवा म्हणून कसे केले याची छान माहिती दिली. विसाव्या वर्षी पेशवेपद मिळाल्यावर सैन्यामध्ये त्यांनी अनेक बदल केले व स्वराज्याचे साम्राज्य करण्यात फार मोठे बलिदान कसे दिले याची माहिती दिली. वेगवेगळ्या ठिकाणी स्वराज्याची केंद्रे उभारली. याच बाळाजी विश्वनाथ भट यांचा मुलगा म्हणजे बाजीराव पेशवा यांनी स्वराज्याचा विस्तार करताना तो स्वतःचा म्हणून नाही तर छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याचा म्हणून विस्तार केला आणि व्यापकाचा धर्म कसा पालन केला हे उलगडून दाखवित पेशवाईचा सुवर्णकाळ मधील पहिल्या दिवशीचे पुष्पातील उत्तररंगाची सांगता केली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने प्रथम पुष्पाचा समारोप झाला. शरद तांबे, चिपळूण. ९९७५९६७९४३
पेशवाईच्या सुवर्णकाळात राष्ट्रहित जपलं गेले – चारुदत्त आफळेबुवा
RELATED ARTICLES



