चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे नमनाच्या कार्यक्रमादरम्यान बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत संतोष पांडुरंग चिनकटे (वय ४०, रा. कुटरे चिंचवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास गावातील सहाणेजवळ नमनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी संशयित आरोपी आकाश चंद्रवदन जगदाळे याने नमन करणाऱ्या कलाकारांना बक्षीस म्हणून काही पैसे दिले होते. मात्र, नमन करणाऱ्या मंडळींनी त्या बक्षिसाची रीतसर पुकारणी केली नाही, याचा राग आकाशला आला. यावरून त्याने नमन करणाऱ्या लोकांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी संतोष चिनकटे आणि इतर साक्षीदारांनी मध्यस्थी करून आकाशची समजूत काढली आणि त्याला बाजूला नेऊन शांत केले. मात्र, आपल्याला शांत केल्याचा राग मनात धरून आकाश जगदाळे आणि चंद्रवदन सखाराम जगदाळे या दोघांनी संतोष चिनकटे यांना गाठले आणि त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी आकाशने संतोष यांच्या नाकावर, तोंडावर आणि छातीवर जोरात ठोसे मारले. या जोरदार प्रहारामुळे संतोष यांच्या डाव्या नाकपुडीचे हाड फॅक्चर झाले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर १० मार्च रोजी रात्री २०:४४ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गु.आर.नं. २०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम ११७(२), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
चिपळुणातील कुटरे गुरववाडीत नमनाच्या कार्यक्रमात राडा बक्षिस पुकारण्यावरून तरुणाला बेदम मारहाण
RELATED ARTICLES



