खेड (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात बुधवारी सकाळी कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हे एमएच ४३ जीई २२४४ या क्रमांकाच्या कंटेनरने लोटे येथून भिवंडी-वाडा दिशेने जात होते. कशेडी घाटातील पोलादपूरजवळील चोळई गावाजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. पलटी झालेल्या कंटेनरमधील कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पहावयास मिळत होते. कंटेनर आडवा झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी संपूर्ण लेन बंद पडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलिसांचाही ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी खेड–पोलादपूर दिशेने जाणारी वाहतूक एका बाजूच्या लेनवर वळवून सुरळीत सुरू ठेवली. त्यामुळे महामार्गावर मोठा अडथळा निर्माण होण्यापासून बचाव झाला. दरम्यान, महामार्गावर पडलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या बाजूला करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर रस्त्यापासून हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.




