Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*सधन होण्यासाठी बांबू लागवड उत्तम पर्याय- डॉ. हेमंत बेडेकर* *कृषी महोत्सवात बांबू...

*सधन होण्यासाठी बांबू लागवड उत्तम पर्याय- डॉ. हेमंत बेडेकर* *कृषी महोत्सवात बांबू उद्योगावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन*

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सुमारे ३५ टक्के जमीन वरकस असल्याने ती पारंपरिक लागवडीसाठी वापरात येत नाही. मात्र यापैकी किमान २० ते २५ टक्के जमिनीवर बांबू लागवड करून त्या बांबूचा औद्योगिक वापर केल्यास कोकणातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तब्बल १०० टक्के वाढ होऊ शकते, असे वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणेचे संचालक डॉ. हेमंत बेडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कृषी प्रदर्शनात कोकणातील बांबू आणि बांबू उद्योग या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन उद्योजक प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बेडेकर म्हणाले की, भारतामध्ये बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही त्याकडे उद्योजकीय दृष्टीने पाहिले जात नाही. मात्र चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांनी बांबूवर आधारित उद्योगातून मोठी आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. आज चिनची बांबू उत्पादने जगभर विकली जात आहेत. भारतात बांबूची उपलब्धता असूनही बांबूवर आधारित उद्योग उभारण्याची मानसिकता नसणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
चिपळूणच्या भौगोलिक परिस्थितीवर भाष्य चिपळूणच्या भौगोलिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, चिपळूणची मला संपूर्ण माहिती असून येथील जमीन डोंगर उताराची असून ती बांबू लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. संपूर्ण तालुक्यातील गावांचा अभ्यास करून माझ्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध असून येथे बांबू लागवड आणि त्यावर आधारित उद्योग निश्चितपणे उभा राहू शकतो. कोकणातील डोंगर मोठ्या प्रमाणावर नष्ट केले जात असल्याने झाडे कमी होत असून केवळ झुडपे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे बांबूसोबत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे, मात्र ही लागवड करताना उत्पन्न निर्मितीचा विचारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, देशांतील शेतकरी एकत्र येऊन शेतीत विविध प्रयोग करीत आहेत, मात्र कोकणातील शेतकरी एकत्र येत नाहीत, याची खंत वाटते. कोकणात आंबा, फणस, काजू, नारळ तसेच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून या सर्व उत्पादकांनी एकत्र येऊन संघ उभारणे आवश्यक आहे. हवामान बदलाचा पिकांवर परिणाम होत असताना योग्य पद्धतीने बांबू लागवड केल्यास एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले. अगरबत्ती उद्योगासाठी लागणारी सुमारे ६५ हजार टन काडी बांबूपासून तयार होते आणि ती सध्या भारताला चीन व व्हिएतनामकडून आयात करावी लागते. ही काडी देशांतर्गत उत्पादनातून उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते. यासाठी खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारल्यास सबसिडी मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
बांबू जाळून कोळसा तयार करण्याऐवजी त्यापासून ऍक्टिव्हेटेड कार्बन तयार केल्यास मोठा आर्थिक फायदा होतो. तसेच बांबूपासून सीएनजी तयार होऊ शकतो आणि बांबूवर आधारित सुमारे १५०० विविध उत्पादने तयार करता येतात. मात्र यासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दूध उत्पादन वाढवण्यासाठी गिरगायी पालन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. उत्पन्न वाढीसाठी केवळ शेती नव्हे तर पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी सुचविले. अशा प्रकारचे प्रयत्न झाल्यास येथील तरुणांचे मुंबईपुण्याकडे होणारे स्थलांतर १०० टक्के थांबू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मी तुमच्या सोबत आहेच. जिथे गरज लागेल तिथे मी उभा राहीन. मात्र त्यासाठी तुम्ही पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. बेडेकर यांनी शेतकरी व उद्योजकांना केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments