चिपळूण : चिपळूण तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय ३७, रा. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दिला. न्यायालयीन माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये हे प्रकरण घडले होते. घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी दिल्यामुळे ती भीतीच्या वातावरणात राहिली होती. त्यामुळे काही काळ ही बाब उघड झाली नव्हती. काही महिन्यांनंतर मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढे पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. सुरुवातीला मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण चिपळूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. चिपळूण पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सादर पुरावे, साक्षी आणि तपासातील कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केला होता. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणांत कठोर संदेश गेला असून समाजातील अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
*१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड* *चिपळूण विशेष न्यायालयाचा निकाल; जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचा निर्णय*
RELATED ARTICLES



