मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने कोकणातील जनजीवन सुसह्य होईल, अशी अपेक्षा होती मात्र वास्तवात या प्रकल्पाने नागरिकांसमोर नवे प्रश्न उभे केले आहेत. मागील सुमारे पंधरा वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अपघातांची मालिका, धुळीचे ढग आणि असुरक्षित प्रवास यामुळे हा महामार्ग विकासाचा नव्हे, तर त्रासाचा मार्ग ठरत आहे. याचबरोबर, या कामाच्या निमित्ताने सुमारे एक दीड लाख अधिक झाडांची अधिकृत तोड करण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, रस्त्यालगतची नैसर्गिक सावली नाहीशी झाली असून उन्हाळ्यात दुपारच्या वेळी प्रवास करणे कठीण झाले आहे. अपघात किंवा वाहन बिघाड झाल्यास नागरिकांना उभे राहण्यासाठीही सुरक्षित, सावलीची जागा उरलेली नाही ही परिस्थिती केवळ अस्वस्थ करणारी नाही, तर धोकादायकही आहे. विशेष म्हणजे, इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार रस्त्याच्या दुतर्फा नियोजनबद्ध पद्धतीने झाडे लावणे बंधनकारक आहे. एका किलोमीटरसाठी शेकडो झाडांची लागवड, त्यांची जोपासना आणि देखभाल ही कामे निविदेत समाविष्ट असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. २००२ पासून सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील पर्यावरणप्रेमी श्री. शाहनवाज शाह यांनी १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. उपविभागीय कार्यालय, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (प्रांत कार्यालय शेजारी) येथे सकाळी १० वाजल्यापासून हे उपोषण होणार आहे. त्यांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर समर्थन दिले आहे. पर्यावरण संवर्धनासारख्या अत्यंत मूलभूत आणि संवेदनशील विषयासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आमरण उपोषणासारखी टोकाची भूमिका घ्यावी लागते, ही बाब केवळ खेदजनक नाही तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि त्याच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणीय जबाबदाऱ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्याबाबतची दीर्घकाळाची दिरंगाई ही शासनयंत्रणेच्या उदासीनतेचे प्रतीक ठरते. या पार्श्वभूमीवर, संबंधित कामात झालेली हेळसांड आणि बेजबाबदारपणाचा ठाम शब्दांत निषेध नोंदवित, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पर्यावरणप्रेमी श्री. शाहनवाज शाह यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच पक्षाचे सर्व तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी उपोषणस्थळी उपस्थित राहून या आंदोलनाला सक्रीय साथ देतील, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाप्रमुख दत्ता कदम रत्नागिरी (दक्षिण) यांनी मांडली आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही केवळ कागदोपत्री बाब न राहता प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. अन्यथा, आजचा रस्ता उद्याच्या पिढीसाठी संकटाचा मार्ग ठरेल. शहानवाज शाह यांचा लढा हा केवळ झाडांसाठी नाही, तर भविष्यासाठी आहे आणि त्यामुळेच हा लढा समाजाने एकजुटीने लढण्याची वेळ आता आली आहे.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी – आता लढा पर्यावरणासाठीच. श्री. शाहनवाज शाह पर्यावरणप्रेमी रा. चिपळूण यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला रत्नागिरी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठींबा.
RELATED ARTICLES



