चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच गुहागर-विजापूर मार्गावर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वृक्षलागवड करण्यात यावी, या मागणीसाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणाच्या पूर्वतयारीसाठी रविवारी, दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक चिपळूण नगरपालिकेसमोरील बापू काणे यांच्या स्वा. सावरकर सभागृहात पार पडणार असून, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, प्रवासी नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर-विजापूर मार्गावरील वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता, इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार वृक्षलागवड व्हावी, या मागणीसाठी हा लढा उभारण्यात येत आहे. १ मेपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने या बैठकीत पुढील रणनीती, जबाबदाऱ्या आणि नियोजन यावर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षलागवडीच्या मागणीसाठी १ मेपासून आमरण उपोषण; पूर्वतयारीसाठी आज बैठक
RELATED ARTICLES



