Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविवाह वाढदिवस दिनी समाजसेवेचा आदर्श; शिवणे नं. २ शाळेला देणगी दोन मुलींचे...

विवाह वाढदिवस दिनी समाजसेवेचा आदर्श; शिवणे नं. २ शाळेला देणगी दोन मुलींचे दत्तक संगोपन

गुहागर (प्रतिनिधी) : आजच्या जगातही संवेदनशीलतेचा आणि समाजभानाचा दीप तेवत ठेवणारा एक प्रेरणादायी उपक्रम शिवणे येथे पहायला मिळाला. जय सोनसाळवी ॲग्रो जामसूतचे मालक प्रकाश पांडुरंग साळवी व सौ. स्मिता प्रकाश साळवी यांनी त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त आनंद साजरा करण्याचा वेगळाच मार्ग निवडत समाजासाठी मोलाची देणगी दिली. या प्रसंगी त्यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा, शिवणे नं. २ ला एक लॅपटॉप व एक प्रिंटर भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत तंत्रज्ञानाची नवी दारे उघडली. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने ही देणगी देण्यात आली. या साहित्यामुळे शाळेतील अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे. याचबरोबर साळवी दाम्पत्याने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत दोन गरजू मुलींना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाची आणि भविष्यातील प्रगतीची जबाबदारी स्वीकारली. या निर्णयामुळे त्या मुलींना आयुष्याची नवी दिशा मिळणार असून त्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जोशी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष संदीप ठोंबरे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिनेश जाक्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी साळवी दाम्पत्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत “समाजासाठी जगणारी माणसेच खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण करतात,” असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. जाक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आज दिलेली ही मदत केवळ वस्तूंची देणगी नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी प्रेरणा आहे.” साळवी दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे गावात एक सकारात्मक संदेश पसरला असून, ‘आपला आनंद इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्यात आहे,’ हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. साळवी दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला असून इतरांनीही अशा सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुख्याध्यापक दिनेश जाक्कर यांना शाळेसाठी ही मदत मिळवून देण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जोशी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी मदत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments