चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून स्थलांतरावरून चर्चेत असलेले कळंबस्ते येथील दीर्घकाळ कार्यरत असलेले पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सोमवारी रत्नागिरीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. गेल्या ४० वर्षाहून अधिककाळ जिल्ह्यात असलेले हे मुख्यालय अखेर रत्नागिरीतील तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीत हलवण्यात आले आहे. चिपळूणमध्ये असलेले हे कार्यालय हलवण्याच्या निर्णयाबाबत स्थानिक पातळीवर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थलांतराबाबत वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतीत कार्यवाही गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली होती. त्यादृष्टीने सोमवारी आवश्यक कागदपत्रे, अभिलेख व कार्यालयीन साहित्य हलवण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. मंगळवारपासून प्रत्यक्ष कामकाज रत्नागिरीतून सुरू झाले आहे. राज्य शासनाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे एकत्रिकरण करून विभागाची पुनर्रचना केली होती. या प्रक्रियेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद रद्द करण्यात येऊन त्याऐवजी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे जिल्हास्तरीय प्रमुख पद निर्माण करण्यात आले. जिह्याचे मुख्यालय रत्नागिरी येथे असतानाही संबंधित कार्यालय चिपळूणमध्ये कार्यरत असल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत होत्या. जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन बहुतांशवेळा रत्नागिरी येथे होत असल्याने चिपळूणहून अधिकाऱ्यांना वारंवार प्रवास करावा लागत होता. या धावपळीमुळे वेळ आणि मनुष्यबळाचा अपव्यय होत असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले. त्यामुळे मुख्यालय रत्नागिरी येथेच असावे, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या स्थलांतरामुळे आता मंडणगडसारख्या तालुक्याच्या टोकापासून शेतकरी व पशुपालकांना विविध प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरी येथे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ व खर्च वाढणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय रत्नागिरीत हलवले कळंबस्तेत ४० वर्षाहून अधिककाळ कार्यरत उत्तर रत्नागिरीतील शेतकरी, पशुपालकांच्या अडचणी वाढल्या
RELATED ARTICLES



