Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूणच्या सोळा वर्षीय मुलाचा काळमावाडी धरणात बुडून दुर्दैवी अंत

चिपळूणच्या सोळा वर्षीय मुलाचा काळमावाडी धरणात बुडून दुर्दैवी अंत

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मामाकडे आलेल्या चिपळूण येथील एका १६ वर्षीय मुलाचा काळमावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी समोर आली. स्वराज्य संदीप शिंदे (रा. ओवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे या मृत तरुणाचे नाव असून, दहावीची परीक्षा संपल्यानंतर तो कोल्हापुरातील कळंबा येथे आपल्या मामाकडे सुट्टीसाठी आला होता. गुरुवारी सकाळी दूधगंगा नदीतील काळोख्या डोहात त्याचा मृतदेह सापडल्याने चिपळूणसह राधानगरी तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, स्वराज्य शिंदे हा आपल्या मामाकडे सुट्टी घालवण्यासाठी आला होता. बुधवारी तो मामा ओंकार पाटील आणि त्यांच्या मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात सहलीसाठी गेला होता. यादरम्यान दूधगंगा नदीच्या पात्रात सर्वजण पोहण्यासाठी उतरले असता स्वराज्यचा पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने सोबत असलेल्यांनी त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. अखेर या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती, मात्र गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी १० च्या सुमारास काळोख्या डोहातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. स्वराज्य हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीस असून त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने ओवळी गावावर शोककळा पसरली आहे. राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक शेळके आणि किरण पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments