Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहापारेषण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संभाजीनगर परिमंडळ अजिंक्य

महापारेषण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संभाजीनगर परिमंडळ अजिंक्य

नागपूर : महापारेषणच्या आंतर परिमंडळीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा (२०२५-२६) बक्षीस वितरण सोहळा काटोल रोडवरील पोलिस कवायत मैदानावर नुकताच उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत सर्वच क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत अति उच्च दाब संचलन व सुव्यवस्था (अऊदासवसु) परिमंडळ, छत्रपती संभाजीनगर संघाने सर्वसाधारण जेतेपद पटकावले, तर कराड परिमंडळाने उपविजेतेपद प्राप्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील उपस्थित होते. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा क्रीडा आयोजन समितीचे अध्यक्ष सतीश अणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करणारा संदेश पाठविला होता. त्यांच्या या संदेशाचे यावेळी जाहीर वाचन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सतीश चव्हाण यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल नागपूर परिमंडळाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, नव्याने रुजू झालेले कर्मचारी आणि अधिकारी यांचा खेळाचा दर्जा वाखाणण्याजोगा आहे. खेळामुळे शिस्त आणि संयम अंगी बाणतो. खेळाडूंच्या मागणीनुसार, दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत व्यवस्थापन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सोहळ्यात येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढील स्पर्धेचे यजमानपद पुणे परिमंडळाकडे सोपवण्यात आले असून क्रीडाध्वजाचे हस्तांतरण पुणे परिमंडळाकडे करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता महेश भागवत, संजीव भोळे, माणिक गुट्टे, जयंत विके आणि शिल्पा कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता खानोरकर, मिनल बडवाईक आणि प्रांजय पाटील यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments