चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले असून या यशात पेठमाप प्रभागाच्या नगरसेविका सौ. रुपाली राकेश दांडेकर यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने त्यांची चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा पदासाठी ठराविक कालावधीसाठी निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही निवड प्रक्रिया सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे पार पडणार असून त्यावेळी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच नगर परिषद निवडणूक प्रभारी प्रशांत यादव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षांतर्गत चर्चेदरम्यान उपनगराध्यक्षा पदासाठी काही नावांची चर्चा होती. मात्र संघटनात्मक अनुभव, पक्षनिष्ठा आणि नगरपरिषदेमधील सक्रिय कामगिरी लक्षात घेता अखेर रुपाली दांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गटनेते शशिकांत श्रीकांत मोदी यांनी दांडेकर यांचे अभिनंदन करत, चिपळूण नगरपरिषदेमध्ये भाजपच्या ध्येयधोरणानुसार विकासात्मक आणि लोकाभिमुख काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्षा पदाची धुरा कोणाच्या हाती जाणार याकडे शहराचे लक्ष लागले असताना, या निवडीमुळे भाजपच्या नगरपरिषदेमधील नेतृत्वाला अधिक बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
*उपनगराध्यक्षापदासाठी रुपाली दांडेकर यांची निवड निश्चित*
RELATED ARTICLES



