चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीदेवी करंजेश्वरी ज्या ठिकाणी प्रकट झाली, त्या सिंगासन स्थळाकडे जाणारा रस्ता लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली. नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर आठ दिवसांच्या आत अल्ताफ चिकटे यांच्या निवासस्थानी लगतच्या जमीनदारांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत ६ मीटर, १२ मीटर की १५ मीटर रस्ता करायचा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासोबत नगरसेवक प्रमोद बुरटे, नगरसेवक उदय जुवळे, विकी लवेकर, प्रल्हाद तांबट, श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर, ज्येष्ठ ग्रामस्थ साईनाथ कपडेकर, तसेच दांडेकर, विनय रेडीज, सिद्धेश रेडीज, वसंत बुरटे, गणेश खातू, अक्षय बामणे आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष सिंहासन स्थळापर्यंत अधिकाऱ्यांसह चालत गेले व तेथे उपस्थित सर्वांशी सविस्तर चर्चा केली. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्णत्वास जाणार असून, जमीनदारांशी चर्चा करून रस्त्याची रुंदी निश्चित केल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले जाईल, असे आश्वासनही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.



