Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized“प्रशासनाला सहकार्य करा; विकासाला वेग द्या!”  नूतन उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे...

“प्रशासनाला सहकार्य करा; विकासाला वेग द्या!”  नूतन उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची पहिली प्रतिक्रिया

खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सोमवारी दुपारी निवड जाहीर होताच नूतन उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील परस्पर सहकार्याची गरज अधोरेखित केली. “नगरपालिका ही रथासारखी आहे आणि प्रशासन व नगरसेवक हे त्या रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके एकसारखी आणि सुरळीत चालली तरच शहराचा विकास गतीमान होईल. म्हणूनच ‘प्रशासनाला सहकार्य करा’ हेच माझे पहिले आवाहन आहे,” असे ते म्हणाले.

शिवसेना नेते आमदार रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी “सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस” असल्याचे त्यांनी भावूक शब्दांत सांगितले. “मी नगरसेवक झालो, म्हणूनच आज उपनगराध्यक्षपदी पोहोचू शकलो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व वरिष्ठांचे, माझ्या आई-वडिलांचे, कुटुंबाचे आणि प्रभागातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो,” असे ते म्हणाले. खेड नगरपरिषद पूर्णपणे युतीची असल्यामुळे वाद-विवाद, स्पर्धा किंवा मतभेदांना येथे स्थान नसल्याचे सांगत चिकणे यांनी सर्वांना एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. “आपल्यात कोण विरोधक नाही. आपण सर्व एकच टीम आहोत. हेवेदावे विसरून विकासकेंद्रित राजकारण करायचे आहे. शहरात प्रलंबित असलेल्या आणि नव्याने आखण्यात येणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करणे हीच आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम विकासकामांसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. “जनतेस दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे आमचे सर्वोच्च ध्येय आहे. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी पाठींबा देणाऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे,” असे ते म्हणाले. एकमताने आणि सलोख्याने काम केल्यास खेड शहराचा विकास निश्चितच गती घेईल, असा विश्वास व्यक्त करत नूतन उपनगराध्यक्ष चिकणे यांनी नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे. शहरवासीयांमध्ये त्यांच्या या विचारांची उत्सुकतेने दखल घेतली जात असून आगामी काळात विकासकामांना नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. यावेळी सौ. श्रेया ताई कदम यांच्यासह नगराध्यक्षा माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय मोदी आणि मिनार चिखले स्वीकृत नगरसेवक

खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर खेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आले होते. केवळ सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी केवळ शिवसेना पक्षाकडून आपले नामनिर्देश पत्र दाखल केले होते. यावेळी त्यांची बिनविरोध खेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसेवकांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी खेड शहरातील नगरपालिका निवडणुकीची धुरा यशस्वी रित्या सांभाळून एकहाती सत्ता आणण्यात ज्यांची मोलाचा वाटा उचलला असे मिनार चिखले आणि संजय मोदी यांची खेड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माधवी बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह गटनेते निकेतन पाटणे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments