Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*नगराध्यक्षांची अधिकाऱ्यांसह कोल्हापुरातील एसटीपी प्रकल्पाची पाहणी* *चिपळूणसाठी आधुनिक मलजल निस्सारण व सांडपाणी...

*नगराध्यक्षांची अधिकाऱ्यांसह कोल्हापुरातील एसटीपी प्रकल्पाची पाहणी* *चिपळूणसाठी आधुनिक मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या दिशेने पावले*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून, याच अनुषंगाने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी कोल्हापूर येथे मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी केली. या अभ्यास दौऱ्यात त्यांच्यासमवेत स्वच्छता व आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव, तसेच शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता नगराध्यक्ष व शिष्टमंडळाने कोल्हापूर नगर परिषदेच्या मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली. या वेळी सांडपाणी प्रक्रिया, त्याचे शुद्धीकरण, पुनर्वापराचे नियोजन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाणी व्यवस्थापन कसे प्रभावीपणे राबवले जाते, याची सविस्तर माहिती घेण्यात आली. चिपळूण शहरात अशा स्वरूपाचा प्रकल्प राबविणे शक्य आहे का, त्यासाठी कोणती भौतिक, तांत्रिक व आर्थिक साधने आवश्यक असतील, याबाबत सखोल चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. या प्रसंगी कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ, आरोग्य सभापती शुभम पिसे आणि बांधकाम सभापती कपिल शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सायंकाळी ४ वाजता नगराध्यक्षांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे भेट दिली. या भेटीदरम्यान विभागीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण उपक्रम तसेच मार्गदर्शन शिबिरांची माहिती घेण्यात आली. विभागीय अधिकारी संदीप जाधव यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच बांधकाम सभापती कपिल शिर्के यांचे स्वागत केले. यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे संघटक विजय शिंदे, योगेश जाधव, सुयोग चव्हाण तसेच चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव व आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते उपस्थित होते. या संपूर्ण दौऱ्याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, चिपळूण शहरातील वाढती लोकसंख्या, स्वच्छतेशी संबंधित आव्हाने आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता आधुनिक मलजल निस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लवकरच संबंधित अधिकारी व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास चिपळूण शहराच्या स्वच्छतेला नवी दिशा मिळेल, पाणी पुनर्वापराला चालना मिळेल आणि पर्यावरणपूरक शहरनिर्मितीस मोठा हातभार लागेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments