महामार्गावर प्रांत कार्यालयाच्या बाजूला शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका अपघाताने काहीकाळ परिसरात चांगलाच गोंधळ उडवून दिला. एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या वयस्कर आईच्या पायाला मार लागल्याची घटना घडली. आईला दुखापत झाल्याचे पाहताच दुचाकीस्वाराचा संताप अनावर झाला आणि पुढे जे घडले, त्याने महामार्गच जणू रंगमंच बनला. अपघातानंतर संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने चक्क परिसर डोक्यावर घेतला. रागाच्या भरात त्याने कारच्या काचेवर हेल्मेटने प्रहार केल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये रंगली. यानंतर दुचाकीस्वार, कार चालक तसेच कारमधील महिला प्रवासी यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. काही मिनिटे शाब्दिक युद्धाचा आवाज महामार्गावर घुमत राहिला. या गोंधळामुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या, तर रस्त्याच्या कडेला जमलेल्या बघ्यांना मात्र अचानक मिळालेल्या या ‘लाईव्ह शो’ची चांगलीच करमणूक झाली. काही जण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, तर काहीजण मोबाईलमध्ये क्षण कैद करण्यात मग्न होते. अखेर उपस्थित नागरिकांच्या मध्यस्थीने वाद निवळला आणि दोन्ही बाजू शांत झाल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र काही क्षणांचा संताप आणि निष्काळजीपणा महामार्गावरील वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरला. या घटनेने पुन्हा एकदा वाहनचालकांनी संयम राखण्याची गरज अधोरेखित केली आहे.
*महामार्गावर रंगला बाचाबाचीचा ‘फड’*
RELATED ARTICLES



