चिपळूण (प्रतिनिधी) : ‘नवीन शिक्षण धोरण २०२० नुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषेचा वापर करून प्रादेशिक भाषा, मानव्यशास्त्रे आणि मूलभूत विज्ञानात संशोधन कौशल्य विकसित करणे’ या मूळ विषयाला अनुसरून भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोग, नवी दिल्ली आणि डीबीजे महाविद्यालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच महाविद्यालयात पार पडली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेंद्र कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व विषद केले. त्याचबरोबर वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाची प्रादेशिक भाषेच्या विकासात असलेली महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी स्पष्ट करून सांगितली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी विचारमंचावर नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. अतुल चितळे, प्राचार्य डॉ माधव बापट, वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाचे सहायक निदेशक व परिषद प्रभारी डॉ. अशोक सेलवटकर, श्री, शैलेंद्र सिंह, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, परिषद आयोजक डॉ. सुधीर मोरे व प्रबंधक श्री विजयेंद्र जाधव उपस्थित होते. राष्ट्रीय धोरण, सर्व शैक्षणिक विषय आणि संशोधनाशी संबंधित वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगाची भूमिका या नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्याबाबत आयोजकांची भूमिका व प्रस्तावना ग्रंथपाल डॉ. सुधीर मोरे यांनी केली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनीही या परिषदेसाठी उपस्थित सर्व सहभागी तज्ञ मार्गदर्शक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सांगितली. डॉ. अशोक सेलवटकर यांनी शब्दावली आयोगाचे कार्य विषद करून प्रमाण भाषेत नवीन शब्द निर्मितीमध्ये आयोगाचे महत्व सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार यांनी परिषदेचे बीज भाषण केले. सुत्रसंचलन आणि आभार प्रा. सौ. श्वेता भिडे यांनी केले. दोन दिवस असलेल्या या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून एकूण ११७ संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अनेक तज्ञ मान्यवर या संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. परिषदेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात पारिभाषिक सज्ञांचे महत्व या विषयवार प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. चेतन आठवले यांनी काम पहिले. याच सत्रातील दुसऱ्या विषयावर डॉ. राजशेखर हिप्परगी यांनी ‘मानवकेंद्रित युगातील जैवविविधता व वन्यजीव : एक आंतरशाखीय दृष्टीकोन’ या विषयवार आपले सादरीकरण केले. या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील डॉ. एच.टी. बाबर यांनी काम पहिले. दुसऱ्या सत्रातील तज्ञ म्हणून विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथील निवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही.डी. वासमकर यांनी ‘शासन व्यवहारातील परिभाषा आणि प्रमाण लेखन’ याविषयावर मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. विजेंद्र जाधव यांनी काम पाहिले. या सत्रातील दुसऱ्या विषयावर आठले-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी ‘एनईपी २०२० मध्ये संशोधन नवोपक्रम आणि मातृभाषेचे स्थान’ याविषयावर आपले विचार मांडले. सत्राचे प्रमुख म्हणून प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस एस वाघमोडे यांनी काम पाहिले. तिसरे सत्र ‘एआयच्या वापरामुळे उद्योगांच्या बदलत्या दिशा आणि नोकरीच्या भूमिकांमध्ये होणारे परिवर्तन’ याविषयावर नवी मुंबई येथील उद्योजक व व्यवस्थापक डॉ. राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. या सत्राला प्रा. सुनील भादुले यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शविली. परिषदेला आलेल्या संशोधकामधून अनेकांनी आपल्या शोध निबंधाचे वाचन केले. या सादरीकरणाच्या सत्राला अध्यक्ष म्हणून प्रा.सौ. ऋचा खवणेकर यांनी काम पहिले. एकूण २९ संशोधक, प्राध्यापकांनी आपले शोध निबंध या परिषदेत सादर करून वाचले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अहिल्यानगर येथील डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी ‘मराठी व हिंदी वैज्ञानिक शब्दावली समानता और शिक्षण में उसका महत्व’ या विषयावर आपले सादरीकरण केले. या सत्राला महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. व्ही.बी. वारंग यांनी काम पहिले. दुसऱ्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. नारायण भोसले यांनी ‘वैज्ञानिक आणि तांत्रिक संज्ञा:मानव्यविद्या संशोधनातील वाढता वापर’ या विषयावर आपले सादरीकरण केले. या सत्राला सत्राध्यक्ष म्हणून इतिहास विभागातील डॉ. डी.टी. कदम यांनी काम पहिले. शेवटच्या सत्रातील विषय ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) मध्ये वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाची भूमिका’ असा होता. या विषयवार सादरीकरण करण्यासाठी उल्हासनगर येथील प्राचार्य डॉ. वसंत पंडित माळी यांची उपस्थिती लाभली. या सत्राचे अध्यक्ष म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस.के. जाधव यांनी काम पहिले. या सर्व परिषदेचा सांगता समारोह दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी झाला. या समारोपाच्या कार्यक्रमाला न.ए. सोसायटीचे खजिनदार संजीव खरे, प्राचार्य डॉ. माधव बापट, वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाचे सहायक निदेशक व परिषद प्रभारी डॉ. अशोक सेलवटकर, शैलेंद्र सिंह, साधनव्यक्ती प्राचार्य डॉ. वसंत पंडित माळी, परिषद आयोजक डॉ. सुधीर मोरे व प्रबंधक विजयेंद्र जाधव उपस्थित होते. यावेळी संजीव खरे यांच्या हस्ते वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाचे सहायक निदेशक व परिषद प्रभारी डॉ. अशोक सेलवटकर, शैलेंद्र सिंह यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दोन दिवसीय परिषदेचा आढावा परिषद संयोजक डॉ. सुधीर मोरे यांनी घेतला. संपूर्ण परिषदेबाबत आपला अनुभव काही सहभागी प्राध्यापकांनी विषद केला. प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी सर्व सहभागी प्राध्यापकांना शुभेच्छा देवून त्यांना प्रमाणपत्रे देवून गौरवित केले. शेवटी परिषदेच्या आयोजकांतर्फे प्रा. राजरत्न दवणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. के.एस. सावरे यांनी केले.
*‘मातृभाषेतून मिळालेले ज्ञान हे कायमस्वरूपी लक्षात राहते’- डॉ राजेंद्र कुंभार* *डीबीजे महाविद्यालयातील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची सांगता*
RELATED ARTICLES



