चिपळूण (संतोष पिलके ) : औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित कार्यसंस्कृती रुजविणे आणि कामगारांमध्ये सुरक्षा जागरूकता वाढविणे या उद्देशाने म्युच्युअल ग्रुप खडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च 2026 रोजी खडपोली एमआयडीसी परिसरात राष्ट्रीय सुरक्षा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रायव्हेट लिमिटेड, साफइस्ट कंपनी, जेके फाईल आणि सुप्रिया लाइफसाइन्स यांच्या पुढाकारासोबतच खडपोली एमआयडीसीतील इतर कंपन्यांचेही सहकार्य व उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावर्षी या रॅलीचे दुसरे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री. भिंताडे साहेब – उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य तसेच श्री. वेल्हे साहेब – सहाय्यक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा. लि. चे सेफ्टी अधिकारी श्री. संदीप जाधव यांनी प्रास्ताविकाने केली. त्यांनी औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सुरक्षा प्रतिज्ञा घेतली आणि मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रॅलीची सुरुवात साफइस्ट कंपनीपासून झाली. त्यानंतर जेके फाईल, ओपल, कृष्णा अँटिऑक्सिडंट युनिट-१ (हेलिओस), सुप्रिया लाइफसाइन्स एमआयडीसी परिसरातून मार्गक्रमण करत कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा. लि. युनिट-३ येथे सांगता करण्यात आली. “सुरक्षा प्रथम – अपघात शून्य”, “सेफ्टी हीच जबाबदारी” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विविध कंपन्यांचे कर्मचारी, अधिकारी व सेफ्टी टीम्स मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीची सांगता कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा. लि. युनिट-३ येथे करण्यात आली. यावेळी कंपनीचे डायरेक्टर रहमान साहेब यांनी सुरक्षाविषयक मार्गदर्शन करत औद्योगिक प्रगतीसोबत सुरक्षितता ही अत्यावश्यक बाब असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी सर्व आयोजक व सहभागी कंपन्यांचे कौतुक केले. यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अशोक पाटील यांचीही उपस्थिती होती. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सेफ्टी अधिकारी श्री. संदीप जाधव, श्री. समाधान काटे, श्री. सिद्धेश मुळे, श्री. धीरज जाधव व श्री. रितेश मोरे यांनी नियोजनबद्ध तयारी करून विशेष परिश्रम घेतले. खडपोली एमआयडीसीतील सर्व कंपन्यांच्या सहकार्य, सहभाग आणि एकोप्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित व जबाबदार कार्यपद्धती रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. खडपोली एमआयडीसी परिसरात पार पडलेल्या या राष्ट्रीय सुरक्षा रॅलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
खडपोली MIDC मध्ये राष्ट्रीय सुरक्षा रॅली उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न कृष्णा अँटिऑक्सिडंट प्रा. लि., साफइस्ट कंपनी, जेके फाईल, सुप्रिया लाइफसाइन्स व इतर कंपन्यांचा संयुक्त पुढाकार
RELATED ARTICLES



