Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*मिरजोळी ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सरपंचपदी विनोद पवार यांची बिनविरोध निवड*

*मिरजोळी ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सरपंचपदी विनोद पवार यांची बिनविरोध निवड*

चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी ग्रामपंचायतचे सरपंच कासम दलवाई यांचे नुकतेच निधन झाल्याने या पदासाठीची पोटनिवडणूक शुक्रवारी ९ जानेवारी रोजी पार पाडली. यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विनोद पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्था २०२१ मध्ये निवडणूक झाल्यानंतर कार्यकाल संपायला अवघा दीड महिना असताना सरपंच कासम दलवाई यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. मिरजोळी ग्रामपंचायत यांनी सरपंच पदाची पोटनिवडणूक घ्यावी असे पत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले. या पत्रामध्ये पोटनिवडणुकीबाबत विशेष सभा शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घ्यावी असे नमूद केले होते. त्या अनुषंगाने या पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. दुपारी २ वाजता विशेष सभा पार पडली. दुपारी २ ते दुपारी २.१० पर्यंत प्राप्त निर्देशक पत्राची छाननी करण्यात आली. दुपारी २.११ ते दुपारी २.२० नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत होती. तसेच दुपारी २.२१ वाजल्यानंतर आवश्यक असल्यास सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येईल. सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र एकही अर्ज न आल्याने विनोद पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक अध्यासी अधिकारी तथा महसूल नायब तहसीलदार चिपळूण वाल्मिकी मोरे यांच्या उपस्थित पार पडली. ग्रामविकास अधिकारी रोहिदास हांगे यांनी विनोद पवार यांना सरपंच म्हणून जाहीर केले.
या निवडीबद्दल बोलताना विनोद पवार म्हणाले की, सर्व सदस्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली याबाबत आपण सर्वांचे ऋणी आहोत. तसेच या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही, असे अभिवचनही नवनिर्वाचित सरपंच विनोद पवार यांनी उपस्थितांसमोर दिले व सर्वांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य माधुरी सकपाळ, वृषाली कदम, संदीप जाधव, कर्मचारी जितेंद्र पवार, नीरज मोहिते, करिष्मा पवार, श्रद्धा पवार, सृष्टी पवार, प्रतिभा पवार, सई पवार, स्वरांगी पवार, मिरजोळी पवारवाडी अध्यक्ष सदानंद पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मिरजोळी अध्यक्ष मिलिंद जाधव, ग्रामस्थ दीपक पवार, मोहन पवार, संजय कांबळे, राजाराम निवाते, नितीन जाधव, सुनील जाधव, प्रफुल कदम, सतीश पवार, संजय पवार, अरविंद जाधव, शुभम पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments