*चिपळूण (संतोष पिलके )* : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक कृषीभूषण तानाजीराव चोरगे यांची एकमताने संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष प्रकाश देशपांडे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण,संयोजन समितीचे अरुण इंगवले, धीरज वाटेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना श्री. देशपांडे म्हणाले की, या संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी खासदार शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री डाॅ.उदय सामंत तसेच समारोपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांचे सह या संमेलनाला महाराष्ट्रातून साहित्यिक, प्रगतशील शेतकरी, सहकारातील कार्यकर्ते, कृषी तज्ञ उपस्थित असणार आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.



