चिपळूण (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नवीन तालुका स्तरावरील संघटन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता रविकिरण बुरटे यांच्या दापोली येथील निवासस्थानी दापोली तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची विचारमंथन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस दापोली तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सभेस स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटना जिल्हा शाखा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर खानविलकर, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पवार, राज्यकार्यकारणी सदस्य राजाराम सावंत तसेच जिल्हा व इतर तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर सभेचे नियोजन पंढरीनाथ देवघरकर, मुकुंद कासारे, रविकिरण बुरटे, शशिकांत तेटांबे, जीवन सुर्वे, रामचंद्र लिंगायत, सतीश वागळे, श्रीमती मनाली कासारे व श्रीमती शीतल गिम्हवणेकर तसेच इतर अनेक सेवानिवृत्त बंधू-भगिनी यांनी केले असून हा संघटनात्मक मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. विशेषतः गुहागर तालुका अध्यक्ष अशोक गावणकर, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान आहे. तसेच मंडणगड तालुक्यातही संघटन उभारणीसाठी ताजुद्दीन परकर, बुरूड व सहकारी प्रयत्न करत आहेत. मंडणगड येथील सभेचे नियोजन झाल्यानंतर सर्व सेवानिवृत शिक्षक व अधिकारी यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. दापोली तालुक्यातील नव्या संघटनात्मक बांधणीच्यावेळी सेवानिवृत्तांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात येणार असून राज्य व जिल्हास्तरावरील पदाधिकारी भविष्यातील उपक्रम व विषयांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दापोली तालुक्यात स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेचे नवीन तालुकास्तरीय संघटन करण्यासाठी २८ रोजी सभेचे आयोजन
RELATED ARTICLES



