Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरडा महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा; ‘हॉर्नबिल क्लब’च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा...

घरडा महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा; ‘हॉर्नबिल क्लब’च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश

खेड (प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले असून विद्यार्थ्यांनी निसर्ग रक्षणाचा संकल्प केला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि नैसर्गिक घटकांविषयी आपुलकी व संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘हॉर्नबिल क्लब’ या संकल्पनेवर आधारित धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. कोळेकर यांनी सांगितले की, धनेश पक्षी मोठ्या प्रमाणात फळे खातात आणि लांब अंतरावर जाऊन त्यांच्या विष्ठेद्वारे बियांचा प्रसार करतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या नवीन जंगलांची निर्मिती होण्यास मदत होते. याच कारणामुळे धनेश पक्ष्यांना ‘जंगलाचा शेतकरी’ असे म्हटले जाते. एखाद्या जंगलात धनेश पक्ष्यांचे अस्तित्व असणे हे त्या जंगलाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते. धनेश पक्ष्यांच्या प्रजननाची अनोखी पद्धतही त्यांनी स्पष्ट केली. मादी धनेश घरट्यासाठी झाडाच्या ढोलीत स्वतःला बंद करून घेते, तर नर धनेश तिची आणि पिल्लांची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. पक्षीजगतात ही पद्धत अत्यंत दुर्मिळ आणि शिस्तबद्ध मानली जाते. वाढती वृक्षतोड, जंगलांचा ऱ्हास आणि शिकारीमुळे धनेश पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आज धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी जुन्या व मोठ्या वृक्षांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे क्लब स्थापन करून समाजात निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखाने महाविद्यालयात “हॉर्नबिल क्लब – धनेश मित्र मंडळ” स्थापन करून धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम सुरू करण्याची शपथ घेतली. दिवसभराच्या उपक्रमांमध्ये महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. तसेच स्वच्छता मोहिमेद्वारे संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पृथ्वीचे रक्षण करणे ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवी. ‘हॉर्नबिल क्लब’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव आणि निसर्गाप्रती आत्मीयता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. अनंत मराठे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालयातील शाश्वत विकास कक्षाचे समन्वयक डॉ. एस. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments