खेड (प्रतिनिधी) – खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह येथून सोमवारी सकाळी गोसेवकांनी भव्य रॅली काढत गोवंश संरक्षण, संवर्धन आणि गोवधावर पूर्ण बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली. ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली असून तहसीलदार, खेड यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. गोसेवकांनी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात गोवंशाच्या संरक्षणासाठी अधिक कठोर आणि प्रभावी कायदे करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. गोवंश हा केवळ एक प्राणी नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमीत गोमातेचा सन्मान आणि सेवा ही परंपरेचा महत्त्वाचा भाग असून आज गोवंश गंभीर संकटात सापडल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्याच्या काळात प्रति व्यक्ती दहा गोवंश उपलब्ध होते, मात्र आज ही संख्या मोठ्या प्रमाणात घटून दहा व्यक्तींमागे एक गोवंश एवढ्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. गोतस्करी, बूचडखान्यांतील अमानुष हत्या, रस्त्यांवरील अपघात, तसेच शहरांमध्ये प्लास्टिक खाल्ल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात गोवंश मृत्युमुखी पडत असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे गोवंश संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा लागू करण्याची शिफारस करावी, गोवधावर संपूर्ण बंदी घालावी, गोतस्करी आणि गोवधाला संज्ञेय व अजामीनपात्र गुन्हा घोषित करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दोषींवर आजीवन कारावास आणि संपत्ती जप्तीची तरतूद करण्याचीही मागणी करण्यात आली. देशी गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राज्यमाता’ म्हणून संवैधानिक मान्यता देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच पंचगव्य आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोबर आणि गोमूत्राचा नैसर्गिक शेती, औषध आणि सेंद्रिय खत म्हणून शासकीय खरेदीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा, जिल्हास्तरावर आदर्श गोअभयारण्य उभारावे, महामार्गांवर गोवाहिनी अॅम्ब्युलन्स आणि ट्रॉमा सेंटरची व्यवस्था करावी, शालेय अभ्यासक्रमात गोविज्ञानाचा समावेश करावा, तसेच गोचर भूमी अतिक्रमणमुक्त करून चारा सुरक्षेसाठी स्वतंत्र धोरण राबवावे, अशा विविध मागण्या गोसेवकांनी केल्या. या रॅलीमध्ये प्रशांत सावंत, दुर्गेश शिगवण, शुभम नांदगावकर, तुर्पेश निंबाळकर, विजय गुप्ता, प्रकाश जोयसर, विनय जाधव, विनय माळी, अमोल जाधव, अभिजीत दळवी आणि रोहन राठोड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गोवंशाला केवळ दयेचा विषय न मानता राज्याची संपत्ती आणि ग्रामीण विकासाचे प्रमुख साधन म्हणून पाहिले जावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनामुळे खेड शहरात गोसंवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गोसेवकांनी व्यक्त केली.
गोवंश संरक्षणासाठी खेडमध्ये भव्य रॅली; तहसीलदारांना निवेदन
RELATED ARTICLES



