Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedहापूसच्या नावाखाली मद्रास आंब्याची विक्री* *कृषी विभागाने कारवाई करावी : शौकत मुकादम*

हापूसच्या नावाखाली मद्रास आंब्याची विक्री* *कृषी विभागाने कारवाई करावी : शौकत मुकादम*

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी व देवगड हापूसची ओळख आणि प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या प्रकारांविरोधात आता आवाज उठू लागला आहे. बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी तथा पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुकादम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही परप्रांतीय विक्रेते बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस असल्याचे सांगून विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून स्थानिक हापूस विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. हापूसच्या नावाखाली दुसऱ्या जातीचा आंबा विकणे ही ग्राहकांची सरळ फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मद्रासचा आंबा विकण्यास बंदी नाही, मात्र त्याला हापूस म्हणून विक्री करणे चुकीचे असून अशा प्रकारामुळे रत्नागिरी-देवगड हापूसच्या गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होऊन बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
परराज्यातून येणाऱ्या गाड्यांमधून मद्रासचा आंबा आणून तो हापूस म्हणून ग्राहकांना विकला जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक तिन्ही घटकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून वस्तुस्थितीची खातरजमा करावी, तसेच मद्रासचा आंबा हापूस म्हणून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे. या प्रकरणामुळे हापूस आंब्याच्या नावाखाली सुरू असलेल्या फसव्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याकडे काय भूमिका घेते, याकडे ग्राहक व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments