Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedदीड वर्ष टपाल न वाटणारा पोस्टमन अखेर बडतर्फ* *घरातून दोन पोती टपाले...

दीड वर्ष टपाल न वाटणारा पोस्टमन अखेर बडतर्फ* *घरातून दोन पोती टपाले केली होती जप्त* *वेळणेश्वर येथील घटना*

गुहागर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेले दीड वर्ष नागरिकांचे टपाल वितरित न करणारा कामचुकार पोस्टमन करण थोरात याला पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी बडतर्फ केल्याची माहिती दिली. पोस्टमन थोरात याच्या घरातून सुमारे दोन पोती टपाल सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
माहितीनुसार, वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात बीड येथील करण थोरात हा पोस्टमन म्हणून कार्यरत होता. नागरिकांच्या मोबाईलवर टपालाबाबत ट्रॅकिंग संदेश येत होते. मात्र, प्रत्यक्षात टपाल घरी पोहोचत नसल्याने ग्रामस्थांनी पोस्ट कार्यालयात तक्रारी करण्यास सुरुवात केली. पोस्ट कार्यालयात नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी करण थोरात याच्याकडे विचारणा केली; मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता, तेथे दोन पोती भरून टपाले आढळली. टपाल वेळेत न मिळाल्याने अनेक नागरिकांचे आर्थिक व प्रशासकीय नुकसान झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता.या टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटीस, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी प्रमाणपत्रे, तलाठी कार्यालयासाठी २०२४ सालातील पत्रे, मुंबई विद्यापीठाची पत्रे, महाविद्यालयीन पत्रव्यवहार तसेच मोजणी नोटीसचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार २४ एप्रिल रोजी उघडकीस आला. तालुका पोस्टमास्तर हिमांशू जोशी यांनीही या घटनेची पाहणी केली आहे.नोटीस उशिरा मिळाल्याने काहींना दोन ते तीन वेळा शुल्क भरावे लागले, तर बँकेच्या लिलाव नोटीस न मिळाल्याने काहींच्या दागिन्यांचे लिलाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधार व पॅनकार्ड न मिळाल्यानेही अनेकांची कामे रखडली असून नुकसानभरपाई कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments