देवरूख : मुंबई गोवा महामार्गासह, मिऱ्या (रत्नागिरी)-नागपूर व गुहागर-विजापूर महामार्गांच्या रुंदीकरणाच्या कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या महामार्गांवर लाखो पुरातन वृक्षांचा बळी गेला असतानाही, पुनर्लागवड व संवर्धनाच्या कामाकडे संबंधित यंत्रणांकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जगातीक वारसा यादी मध्ये समाविष्ट सहयाद्री पर्वत परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रत्यक्षात लावण्यात येणारी झाडे निकृष्ट दर्जाची असल्याने ती टिकून राहत नाहीत. परिणामी “कागदी वृक्षलागवड” होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना सावली मिळत नसल्याने प्रखर उन्हात त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील पर्यावरणप्रेमी शहनावाज शाह यांनी दिनांक १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला असून, त्यांच्या या आंदोलनाला देवरुख येथील क्रांती व्यापारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. क्रांती व्यापारीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “विकासाच्या नावाखाली सुरू असलेला निसर्गाचा ऱ्हास थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत वृक्षतोडीनंतर नियमांनुसार मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व त्यांचे संगोपन करणे बंधनकारक असतानाही, संबंधित ठेकेदार व यंत्रणा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना अपयशी ठरत आहेत. संस्थेने पुढे मागणी केली आहे की, महामार्गांवरील वृक्षलागवडीची तात्काळ तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, स्थानिक प्रजातींची झाडे लावावीत तसेच त्यांचे किमान काही वर्षे संगोपन सुनिश्चित करावे. अन्यथा कोकणातील पर्यावरण व जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊन भविष्यातील पिढी धोक्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, शहनावाज शाह यांच्या उपोषणामुळे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, विविध सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी यांचा पाठिंबा वाढत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष; शहनावाज शाह यांच्या उपोषणाला देवरूखमधील ‘क्रांती व्यापारी’ संघटनेचा जाहीर पाठिंबा
RELATED ARTICLES



