मंडणगड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी १ मे रोजी तालुक्यातील विविध समस्यांकरिता उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दि. २८ एप्रिल रोजी तहसिलदार मंडणगड यांच्याकडे राजेश गमरे यांनी सादर केलेल्या निवेदनातील माहीतीनुसार भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे असल्याने विशेष बाब म्हणून राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी डी च्या दुपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे जनतेला अनेक अडचणींना आजही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संदर्भीय निवेदनाद्वारे १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी ते उपोषणास बसणार असल्याचे कळविले होते त्या अनुषंगाने १३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्राने संबंधित कार्यालयाने आश्वासित केल्यानंतर व प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन सदरचे उपोषण स्थगित केले होते. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही. पंढरपूर राजेवाडी ते आंबडवे मंडणगड राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी च्या दुपदरीकरणचे काम मे २०२६ अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित कार्यालयाने दिले होते. सदर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नसून उलट कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. यामध्ये मंडणगड शहरातील रस्त्याची रुंदी कमी व गटार व्यवस्था रद्द केल्याचे व पादचाऱ्या करिता फुटपाथची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास येत आहे. शाळा. महाविद्यालय,रुग्णालय, बँका व शासकीय. निम शासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी ये-जा करण्यासाठी महामार्गावरून प्रवास करताना फुटपाथ नसल्यास अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच गटार व्यवस्था रद्द केल्याने सांडपाण्याच्या बरोबर पावसाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. या त्रुटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. तसेच मंडणगड शहराच्या मुख्य चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही संपूर्ण भारत देशाची शान असलेल्या महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून बसविणे करिता चौकाचे रुंदीकरण त्या पद्धतीने होणे आवश्यक असून त्याची तरतूद आत्ताच करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग.965 डी.डी.च्या दुपदरीकरणाकरिता मंडणगड हद्दीतील हटविण्यात आलेले गरीब खोकेधारक व्यवसायिकांचे पुनर्वसन करणे ही नैतिक जबाबदारी ओळखून प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घ्यावी आणि ही सर्व कुटुंब उध्वस्त होणार नाहीत याची दखल घ्यावी. सदरच्या मागण्या जनहितार्थ असल्यामुळे मी माझ्या सहकार्यासमवेत १ मे रोजी महाराष्ट्रदिनी मंडणगड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. उपोषणाचे दरम्यान उपोषण कर्ते यांच्या जीवितास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित कार्यालय अधिकारी यांची राहील याची गंभीर नोंद घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांचे १ मे रोजी उपोषण
RELATED ARTICLES



