चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूणने अवघ्या दोन-अडीच वर्षांत ३० हून अधिक विविध उपक्रम राबवत उल्लेखनीय कामगिरी केली असून शाखेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत कृषिभूषण, सहकार महर्षी, लेखक, अभिनेते व दिग्दर्शक तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिबिराच्या प्रशिक्षिका प्रा. रश्मी देव, रत्नागिरी जिल्हा बँकेचे निवृत्त एमडी अजय चव्हाण, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे संचालक विनायक ओक, शाखाध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, खजिनदार ॲड. विभावरी रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पालकांनी शिबिरात शिस्त व वेळेचे महत्त्व पाळावे, असे आवाहन केले. तसेच विविध क्षेत्रांत व्यस्त असूनही डॉ. चोरगे यांनी वेळेत उपस्थित राहून आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. रश्मी देव यांनी दहा दिवसांच्या शिबिराचा आढावा घेतला. डॉ. चोरगे यांनी विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील स्पर्धा, आवश्यक मेहनत आणि संधी यांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. या शिबिरात ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार मनीषा दामले यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी छाया पोटे, संगीता जोशी, मंगेश बापट, संजय सरदेसाई, संजय कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नाट्य परिषद चिपळूण शाखेचे कार्य कौतुकास्पद : डॉ. तानाजीराव चोरगे सलग तिसऱ्या वर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES



