चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमधील हरहुन्नरी गायक श्री उदय गोरे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे असलेले उदय गोरे हे अनेक वर्षांपासून चिपळूणमध्ये वास्तव्यास होते. सध्या ते खेर्डी येथे राहत होते. आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा बजावली. शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. संगीताची प्रचंड आवड आणि सुरेल आवाजाच्या जोरावर त्यांनी चिपळूणमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. चिपळूणमधील नामांकित ‘म्युझिकल अवर्स’ या ऑर्केस्ट्रा समूहाचे ते फाउंडर मेंबर होते. या संस्थेच्या उभारणीत आणि विविध कार्यक्रमांच्या यशस्वी सादरीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय ‘चौकट’ या सांगीतिक क्षेत्रात कार्यरत संस्थेचे ते संस्थापक होते. ‘चौकट’च्या माध्यमातून त्यांनी मुंबई ते गोवा परिसरात सुमारे ३०० हून अधिक कार्यक्रम सादर केले. विविध प्रकारच्या गाण्यांच्या मैफिली त्यांनी रंगवल्या; मात्र भावगीत हे त्यांचे खास मर्मस्थान होते. त्यांच्या आवाजातील भावस्पर्शी सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकली होती. मनमिळावू स्वभाव, साधेपणा आणि संगीतावरील निष्ठा यामुळे ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
हरहुन्नरी गायक उदय गोरे यांचे निधन भावगीतांच्या मैफिलींनी रसिकांची मनं जिंकणारा सुरेल आवाज हरपला
RELATED ARTICLES



