चिपळूण (वार्ताहर) : चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात शनिवारी दि. १० रोजी आनंद मेळ्याचे आयोजन केले होते. नवोदित आणि अनुभवी अशा स्थानिक गायक कलाकारांना यावर्षी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. सायंकाळी सर्व कलाकार आल्यावर प्रथम श्रीदेव वीरेश्वर मंदिरात जाऊन संचालक आणि कलाकारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यवाह रमेश चितळे यांनी कलाकारांचे आणि कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांचे शब्दसुमानानी स्वागत केले. तसेच संघाचे वर्षभरातील जे उपक्रम होतात त्यांच्या विषयी माहिती दिली. मग सर्व कलाकार गायिका सौ. राधिका देवधर, गायक वरद केळकर, तबलासाथ करणारे प्रथमेश देवधर, संवादिनी साथ करणारे पार्थ परांजपे, तालवाद्य साथ करणारे कॅप्टन शेंबेकर आणि निवेदनाची बाजू समर्थपणे सांभाळणारे चिपळूणचे सुप्रसिध्द प्रवचनकार धनंजय चितळे. यांचे संघाचे अध्यक्ष अविनाश पोंक्षे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर हळूहळू कार्यक्रम रंगत गेला. हरी धनंजय चितळे त्या-त्या गाण्याचे पौराणिक आणि अन्य संदर्भ देत होते. अल्पावधीतच गायकांनी आणि सहकलाकारांनी श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतला आणि गायन अधिकाधिक रंगतदार होत गेले. मी पुन्हा या गाण्याची पुन्हा फर्माईश करण्यात आली. सुमारे सव्वा तासांनी किंचित मध्यंतर घेण्यात आले. त्यावेळी संघाचे उपाध्यक्ष श्री केतकर यांनी सर्व कलाकार, भोजनासाठी गुळपोळ्या पुरविणाऱ्या सौ. प्राजक्ता फणसे, भाकऱ्या पुरविणाऱ्या सौ.सीमा तांबट आणि त्यांच्या सहकारी, भोजन व्यवस्था देणारे श्री केटरर्स, सचिन चितळे श्री. नाचणकर, श्री करंजकर, प्रशांत लाटकर, विश्वास देवधर आणि ध्वनी व्यवस्था देणारे श्री. जुवळे तसेच सर्व उपस्थित श्रोतृवर्ग आणि सहकार्य करणारे अन्य सर्व यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भैरवीच्या वेळी तर श्रोते गायक बरोबर राम नामाचा जयघोष करू लागले. गायनाच्या कार्यक्रमा नंतर सुग्रास भोजनाचा लाभ सर्व उपस्थितांनी घेतला. भोजनोत्तर घरी परतताना अनेक लोकांनी संचालकांना कार्यक्रम आणि भोजन दोन्ही खूप छान होते असे मुद्दाम भेटून सांगितले. त्यामुळे संचालक मंडळाला आपण घेतलेल्या परिश्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. संचालकांनी सर्वाना धन्यवाद दिले.
चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाचा वार्षिक आनंदमेळा उत्साहात
RELATED ARTICLES



