मुंबई – मुंबईतील लोकलमधून खाली पडून अनेकजण आपला जीव गमावतात. अशातच लोकल रेल्वेमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, या निष्काळजीपणामुळे आणखी एका प्रवाशाचा बळी गेला आहे. मनीष बाळू लोखंडे असे मृत प्रवाशाचे नाव असून नाहूर स्थानक परिसरात रविवारी धावत्या लोकलमधून तो खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मध्य रेल्वेवरती रुळांसह सिग्नलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला जातो. या वेळेत लोकल वाहतूक संपूर्णपणे कोलमडते त्यानंतर याचा मोठा फटका नागरिकांना बसतो आणि रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड मोठी गर्दी उसळते. परिणामी, प्रवाशांना दुपारच्या वेळेतही दरवाजात लटकूनच प्रवास करावा लागतो. अशातच मनीष बाळू लोखंडे याचा झालेला अपघाती मृत्यू अशाच रविवार ब्लॉकचा बळी असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मनीष बाळू लोखंडे हा माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन पदावर काम करत होता. त्याने कुर्ला येथून बदलापूरसाठी लोकल पकडली. प्रचंड गर्दीमुळे त्याला दरवाजात लटकत राहावं लागलं. लोकल दुपारी १.५०च्या सुमारास नाहूर स्थानकाजवळ पोहोचत असतानाच मनीषचा लोकलमधून तोल गेला आणि तो रुळांवरती पडला, यावेळी मनीष गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी मनीषला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.



