चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत उपजीविकेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे संजीव करपे यांना सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने स्वर्गीय शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त “शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार–२०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना बोलताना श्री. करपे यांनी “आत्मनिर्भर कोकण भूमीसाठी व्यवसाय भूमिकता आवश्यक असून स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारणी ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले. कोकणातील युवकांमध्ये बुद्धिमत्ता असून त्यास कौशल्याची जोड दिल्यास निसर्गाची हानी न करता टिकाऊ विकास साधता येतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. करपे हे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (KONBAC), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) चे मार्गदर्शक संचालक असून त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बांबू लागवड, प्रक्रिया, डिझाइन, उत्पादन, उद्यम विकास व विपणनाचे एकात्मिक मॉडेल उभारले आहे. या माध्यमातून हजारो ग्रामीण कारागीर, महिला व युवकांना कौशल्याधारित रोजगार व आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. KONBAC ची स्थापना 1998 साली करण्यात आली असून या कार्यासाठी त्यांना वेळोवेळी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच JANS Bamboo Products Pvt. Ltd. आणि Woodygrass या उपक्रमांद्वारे भारतीय बांबू उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी ओळख मिळाली आहे. भारतासह मालदीव व इतर देशांतील इको-रिसॉर्ट्स, बांबू संरचना व पर्यावरणपूरक बांधकामांमुळे शाश्वत पर्यटन व हरित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या बांबू उत्पादनाला योग्य भाव देऊन त्यांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीस मोठा हातभार लागल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमात त्यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून यजुर्वेद महाजन, अभिनेत्री गार्गी फुले थत्ते, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, विश्वस्त शांताराम खानविलकर, मारोतराव घाग, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक, प्रशांत निकम, चित्रकार व जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रकाश राजेशिर्के, अंजनी चोरगे, युगंधरा राजेशिर्के, पूजा निकम, नवनियुक्त नगरसेवक निहार कोवळे यांच्यासह कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच सावर्डेचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संजीव करपे शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार–२०२६ने सन्मानित* *आत्मनिर्भर कोकण भूमीसाठी व्यवसाय भूमिकता आवश्यक- संजीव करपे*
RELATED ARTICLES



