Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा ...

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा  “इतिहास समजून भविष्य घडवा”- राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारूदत्त आफळे बुवा

चिपळूण (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी एनएसएस व एनसीसी विभागातर्फे दोन किलोमीटरची युवा दिनानिमित्त मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यानंतर कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारूदत्त आफळे बुवा व प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर धनंजय चितळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी युवकांमध्ये संस्कार, शिस्त व सामाजिक भान निर्माण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. राजमाता जिजाऊंच्या आदर्शावर भाष्य करताना ते म्हणाले, “उत्तम मुलं घडविणं हे सर्वांत मोठं करिअर आहे. भारताचे जबाबदार पालक व्हायचं असेल तर आपल्या मुलांना वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकात एक शिवबा असतो, फक्त अनावश्यक गोष्टी दूर कराव्या लागतात.” भारताच्या इतिहासाकडे पाहताना ते म्हणाले की, “अत्यंत दुर्बल हेरखातं आणि चुकीच्या माहितीवर आधारित निर्णय यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले.” यानंतर डॉ. चारूदत्त आफळे बुवा यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी “जुन्या लोकांच्या आठवणी का महत्त्वाच्या आहेत?” या प्रश्नावर भाष्य करताना सांगितले की, “नवे पंचतंत्र म्हणजे जुन्या कथांना नवे वळण देऊन आजच्या पिढीला शहाणं करणं. इतिहास समजला तर चूका टाळता येतात आणि राष्ट्र योग्य दिशेने पुढे जाते.” छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मांडताना ते म्हणाले, “छत्रपतींनी तलवार चालवली, पण भवानीवर श्रद्धाही ठेवली. देशाच्या संस्कृतीवर आघात झाला तर संन्याशालाही पेटून उठावे लागते.” पूर्वी समाजात स्वयंपाक, शेती आणि सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाचे विषय होते आणि आजही राष्ट्र उभारणीसाठी हेच आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “बुद्धी जितकी महत्त्वाची आहे, तितकंच मनगटाचं बळही आवश्यक आहे. युवकांनी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे.” योगसाधना, बॉक्सिंग व विविध खेळ यांच्या माध्यमातून शरीर आणि मन दोन्ही सक्षम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. युवकांना प्रेरणा देताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, “अपयश हे माणसाला थांबवण्यासाठी नसून त्याला अधिक मजबूत करण्यासाठी असतं. अपयशावर मात करा, स्वतःला संपवू नका.” स्वामी विवेकानंदांच्या बालपणातील किस्सा सांगताना त्यांनी लहान नरेंद्र आणि त्याच्या वडिलांचा संवाद उपस्थितांना भावून गेला. नरेंद्र ‘घोडेवाला होणार’ असे सांगतो, तेव्हा वडील म्हणतात, “घोडेवाला हो, पण असा हो की तुझ्या घोडागाडीत अर्जुन बसला पाहिजे.” या कथेतून त्यांनी सेवा, श्रेष्ठता व कर्तव्यभावनेचा संदेश दिला. “मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कृतज्ञतेतून भक्ती निर्माण होते, केवळ काही मिळवण्यासाठी नव्हे,” असे सांगत त्यांनी प्रयत्न आणि श्रद्धा यांचा संगमच यशाचे खरे सूत्र असल्याचे स्पष्ट केले. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा संवाद सांगताना त्यांनी समाजातील अशिक्षित व भुकेल्यांसाठी कार्य करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी वातावरणात हा राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. चेतन आठवले यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी चैतन्य परिवाराचे थत्ते व इतर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार संजीव खरे, सौ. स्नेहल कुलकर्णी, उपप्राचार्य, श्री. जाधव, रजिस्टर, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख मेजर नम्रता माने व लेफ्टनंट मधुसूदन माने, राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ विभाग प्रमुख डी. टी. कदम व कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख अविनाश पालशेतकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट मेजर नम्रता माने यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गायन करून कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments