Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींच्या पसंतीस उतरलेल्या ‘गणपत वाणी बिडी पिताना’ समस्यापूर्ती काव्यलेखन...

*बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींच्या पसंतीस उतरलेल्या ‘गणपत वाणी बिडी पिताना’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर*

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अभिनव स्वरुपाच्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थच्या राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखनस्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता होती. निकाल पुढीलप्रमाणे- विजेता- अतुल नरहर देशपांडे (नाशिक), किरण वेताळ (पुणे), डॉ. मनोज सुर्यकांत वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ- विजय यशवंत सातपुते (पुणे), विजया गुळवणी (पुणे), वृंदा सचिन कुलकर्णी (पालघर), सुधीर सोमकांत नागले (रायगड) हर्षदा सुंठणकर (बेळगाव). प्रोत्साहनपर- सुजाता संजय (लंडन), डेविड पेनकर (इस्त्रायल), शर्मिला पटवर्धन (बंगलोर), सुषमा राम वडाळकर (बडोदे), कविता पुणतांबेकर ‘कुमुद’ (इंदौर), सारिका दत्तात्रय बिवलकर (रत्नागिरी), मेधा विनायक लोवलेकर (चिपळूण). या काव्यलेखन स्पर्धेसाठी जगभरातून एकूण ५४८ कविता दाखल झाल्या. काही कविता पेनाने कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवलेल्या होत्या. त्यापैकी काही कवितांची इमेज क्वालिटी खूपच खराब असल्याने नाईलाजाने या कविता सुरुवातीलाच बाद ठरवून ५३६ कविता स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आल्या. पुन्हा त्यातील १६ कवितांची प्रिंट क्वालिटी काळी आल्याने ५२० कविता स्पर्धेसाठी कोडींग करण्यात आल्या. या कोडींगमध्ये स्पर्धक कवीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर वगळून सर्व कवितांना फक्त क्रमांक देण्यात आले होते. अशा कोडींग केलेल्या कविता पहिल्या फेरीसाठी प्रा. मोहन कुंभार (सिंधुदूर्ग), श्रीम. कल्पना दुधाळ (नांदेड), विजय जोशी (डोंबिवली), प्रा. अंजली बर्वे (रत्नागिरी) या चार परीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या. या पहिल्या फेरीतून १०२ कविता निवडल्या गेल्या. ज्यांचे री-कोडींग करून त्या दुसऱ्या फेरीत अरुण म्हात्रे (ठाणे), डॉ. अनुजा जोशी (गोवा), प्रा. एल. बी. पाटील (रायगड), मंदार ओक (चिपळूण) या परीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या. त्याआधारे उपरोक्त निकाल जाहीर करण्यात आला आहे. बृहन्महाराष्ट्र आणि जगातील इतर देशांत मराठी भाषा जपणाऱ्या आणि मराठीतून लिहित्या राहिलेल्या कवींना मराठी मुलखात वावरणाऱ्या कवींच्या स्पर्धेत उतरवणे योग्य ठरणारे न वाटल्याने आयोजकांमार्फत अधिकचे ५ आणि ज्या जिल्ह्यात स्पर्धा आयोजित केली गेली त्या जिल्ह्यातील २ कवींना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या अभिनव स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चिपळूणला संपन्न होणार असून याबाबतचा तपशील यथावकाश कळवण्यात येणार आहे. असे आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे चिपळूण अध्यक्ष अरुण इंगवले यांनी कळवले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments