चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील बावशेवाडी येथील मैदानावर गेले अनेक वर्षे सुरू असलेल्या रोटरॅक्ट क्लब आयोजित फन फेअरचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. फीत कापून या फन फेअरचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. अल्ताफ सरगुरोह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, सन १९९७ पासून फन फेअर सुरू असून या माध्यमातून चिपळूणवासीयांचे सातत्याने मनोरंजन होत आहे. यंदा या फन फेअरचे तिसावे वर्ष असून विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून आ. जाधव यांच्या एकाच हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून कोरोना काळात कामथे उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच महापुराच्या काळातही क्लबने मोलाची मदत केली. सामाजिक कार्यात रोटरी क्लब नेहमीच आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. आ. जाधव यांनी फन फेअरला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत हा महोत्सव अधिक तरुण झाला असल्याचे सांगितले. चिपळूणवासीयांच्या उत्साहातून आपल्याला नेहमीच ऊर्जा मिळते, असे सांगत त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्वही अधोरेखित केले. यावेळी सुवर्णा भास्कर जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, सतीश खेडेकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, माजी नगरसेवक मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नारळकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाबू तांबे, राजा दळी, नगरसेविका उमा देसाई, गणेश आग्रे, सुयोग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वीकृत नगरसेवक फैसल कासकर व प्रशांत देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला. फन फेअरच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर, राहुल रेडीज, शैलेश टाकळे, मंदार आवले, मनोज जैन, बाळा अंबुर्ले आदींनी परिश्रम घेतले.
*रोटरॅक्ट चिपळूण फन फेअरला ३० वर्षांची परंपरा; आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन*
RELATED ARTICLES



