Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*अजितदादांच्या मृत्यूमागे घातपात? चर्चा सुरू होताच शरद पवारांनी माध्यमांसमोर येवून दिले उत्तर;...

*अजितदादांच्या मृत्यूमागे घातपात? चर्चा सुरू होताच शरद पवारांनी माध्यमांसमोर येवून दिले उत्तर; म्हणाले, या घटनेमागे कोणतंही राजकारण नसून हा निव्वळ अपघात आहे*

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बारामतीमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल उपस्थित केलेल्या एका शंकेमुळे वादाला तोंड फुटले होते. मात्र, ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे काका शरद पवार तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली ठोस भूमिका मांडत या दाव्यातील हवा काढून टाकली आहे. हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता, यात कोणताही घातपात नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर कोसळले आणि त्याला आग लागली. या भीषण घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा आणि वैमानिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करतानाच, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली होती. हा अपघात नसून यात काहीतरी काळं-बेरं असण्याची शक्यता त्यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केली होती. त्यांच्या या मागणीमुळे राष्ट्रीय राजकारणात काही काळ चर्चेला उधाण आले होते. कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ममता बॅनर्जींच्या दाव्यावर आणि राजकीय चर्चांवर उत्तर देताना शरद पवार अतिशय भावूक झाले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अजित पवार यांच्यासोबत झालेली ही घटना केवळ एक अपघात आहे. यात कोणताही कट किंवा घातपात शोधण्याची गरज नाही. पवार म्हणाले की, महाराष्ट्र एका सक्षम नेत्याला मुकला आहे आणि ही राज्याची मोठी हानी आहे. ही वेळ राजकारण करण्याची किंवा आरोप करण्याची नाही, असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील संशयाचे ढग दूर केले. शरद पवारांनी स्वत: हा अपघात असल्याचे सांगितल्याने घातपाताच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या पातळीवर जातोय ही अतिशय दुःखद गोष्ट असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या एका लाडक्या नेत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर त्यावर अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले. ममता बॅनर्जी यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशा शब्दांत त्यांनी आपला निषेध नोंदवला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा इतका दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्यावर राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. संपूर्ण राज्य सध्या दुःखात आहे आणि अशा वेळी अजितदादांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी अशा प्रकारचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी सर्व राजकीय नेत्यांना केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments