चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी एमआयडीसी परिसरातील स्मशानभूमीच्या जंगलमय भागात बेकायदेशीररीत्या गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन युवकांवर चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे. अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास खेर्डी एमआयडीसीतील स्मशानभूमी परिसरात जंगलात बसून गांजा सेवन करत असताना आकाश रामचंद्र चव्हाण (वय २५, रा. विकासवाडी, खेर्डी) हा युवक आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी यांनी फिर्याद दाखल केली आहे. या आरोपीविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात आणखी एक युवक गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रोशन महेंद्र चोगले (वय २५, रा. विकासवाडी, खेर्डी) असे या आरोपीचे नाव असून पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये संशयित आरोपी स्मशानभूमीच्या जंगलमय परिसरात बसून बेकायदेशीररीत्या गांजा सेवन करत असल्याचे स्पष्ट झाले असून, खेर्डी परिसरातील स्मशानभूमी गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत चालल्याची चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणांचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
*खेर्डी स्मशानभूमी परिसर बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा* *गांजा सेवन करणाऱ्या दोन युवकांवर पोलिसांची कारवाई*
RELATED ARTICLES



