खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बहिरवली–करंबवणे पुलाच्या मागणीला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. जगबुडी–वाशिष्टी खाडीवरील या प्रस्तावित पुलासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याचे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे. खाडीपट्टा विभागातील बहिरवली ते करंबवणे हा पूल कुणबी समाज व मुस्लिम समाजासह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत गरजेचा होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या भागातील सरपंच, विभागप्रमुख तसेच कुणबी व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड–दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांची भेट घेऊन या पुलाची आग्रही मागणी मांडली होती. या मागणीचे गांभीर्य ओळखून गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुलाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाची भौगोलिक, सामाजिक व आर्थिक उपयुक्तता लक्षात घेत संबंधित विभागाला तातडीने सविस्तर अंदाजपत्रक व तांत्रिक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या प्रशासनाकडून प्राथमिक पाहणी, आवश्यक माहिती संकलन आणि तांत्रिक बाबींची चाचपणी सुरू असून, अंदाजपत्रक पूर्ण होताच पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबविली जाणार आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग हा निसर्गसंपन्न आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र आजतागायत भौगोलिक अडचणींमुळे येथील अनेक गावांना चिपळूण किंवा भरणे नाका मार्गे मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. बहिरवली–करंबवणे पूल उभारला गेल्यास हा खाडीपट्टा विभाग थेट चिपळूणशी जोडला जाणार असून, दोन्ही तालुक्यांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या पुलामुळे दळणवळण अधिक सुलभ होणार असून पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. चिपळूणमार्गे दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांना हा नवा मार्ग सोयीचा ठरणार असून, सुमारे शंभर किलोमीटरहून अधिक अंतर आणि मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे. याचा थेट फायदा स्थानिक व्यवसाय, पर्यटनपूरक उद्योग आणि रोजगारनिर्मितीला होणार आहे. या पुलाच्या माध्यमातून खाडीपट्टा विभागातील तसेच शेजारील पन्नासहून अधिक गावांचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यटनात्मक विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खाडीपट्टा विभागातील नागरिकांनी, विशेषतः या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कुणबी समाज व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने, शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचे विशेष आभार मानले आहेत. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करत हा पूल लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बहिरवली–करंबवणे पूल हा खाडीपट्ट्याच्या दळणवळण, पर्यटन आणि सर्वांगीण विकासाचा कणा ठरणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
खाडीपट्ट्याच्या विकासाला गती बहिरवली–करंबवणे पुलासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे शासनाचे आदेश
RELATED ARTICLES



