Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमौनातून नेतृत्वाकडे : सुनेत्रा पवारांचा राजकीय प्रवास

मौनातून नेतृत्वाकडे : सुनेत्रा पवारांचा राजकीय प्रवास

नेहमी पडद्यामागे राहिलेली ‘वहिनी’ आता केंद्रस्थानी अजित पवारांच्या निधनानंतर नेतृत्वाची कसोटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात कधीच आक्रमक राजकारणी म्हणून ओळखल्या गेल्या नाहीत. शांत, मोजक्या शब्दांत काम करणारी आणि सामाजिक कार्यात रमलेली अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर त्या अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. निवडणुकीपेक्षा मोठा प्रश्न आता त्यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल, हा आहे. अनुभवी राजकारणी बनण्याकडे त्या वाटचाल करतील की केवळ मवाळ चेहरा ठरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे : पवार कुटुंबाच्या राजकारणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कधीच मोठ्या आवाजात बोलणाऱ्या नव्हत्या. त्यांचे दिवंगत पती अजित पवार हे त्यांच्या भेदक राजकीय शैली आणि एक-ओळीतील तिरकस विधानांसाठी ओळखले जात होते, तर सुप्रिया सुळे या त्यांच्या ऊर्जावान आणि आक्रमक उपस्थितीसाठी प्रसिद्ध होत्या. त्या तुलनेत सुनेत्रा पवार या राखीव, संयमी आणि मोजक्या स्वभावाच्या राहिल्या. नेहमी साध्या पण सुरेख साडीत दिसणाऱ्या सुनेत्रा पवार या बारामतीच्या ‘वहिनी’ म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक, पर्यावरणीय प्रश्न आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. धाराशिव येथील राजकीय कुटुंबातून त्या आल्या असल्या तरी अजित पवारांशी विवाहानंतरही त्या बराच काळ प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिल्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणामुळे त्या अनेक वर्षे मुंबईत राहिल्या. मुलं कॉलेजला गेल्यानंतरच त्यांनी बारामतीत सक्रिय कामाला सुरुवात केली. २००४ मध्ये केंद्र सरकारच्या निर्मल ग्राम योजनेतून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. काटेवाडी हे उघड्यावर शौचमुक्त गाव करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. पुढे बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून १५,००० हून अधिक महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. २०२४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांचा राजकीय स्वभाव अधिक ठळकपणे दिसून आला. समोरची व्यक्ती रागावलेली असतानाही त्या शांतपणे ऐकून घेणाऱ्या असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी प्रचारात केलेल्या वैयक्तिक टीकेनंतरही सुनेत्रा पवार यांनी मौन पाळले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी कुटुंबीयांबाबत सार्वजनिक भाष्य टाळले. प्रचारादरम्यान त्यांनी आपला राजकीय अननुभव लपवला नाही. पतीच्या कार्याच्या नावावर मतं मागणं त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारलं. मात्र, गर्दीला मोहून टाकणारे भाषण, रॅलीतील आक्रमकता यात त्यांची कमतरता जाणवली. उष्णता, धूळ आणि आरोग्याच्या अडचणी यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्या थकलेल्या दिसल्या. याउलट, अनुभवी नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक संधीचा उपयोग करत १.५५ लाख मतांनी विजय मिळवला. तरीही, लहान मेळावे, विशेषतः महिलांसोबत संवाद साधताना सुनेत्रा पवार अधिक सहज दिसून आल्या. शिक्षण, रोजगार, स्वयं-सहायता गट आणि कर्ज योजना या विषयांवर त्या आत्मविश्वासाने बोलत होत्या. राज्यसभेतील उपस्थिती मर्यादित असली तरी त्या शांतपणे काम करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची प्रतिमा सहनशक्तीच्या प्रतीकात बदलत आहे. निवडणूक जिंकण्यापेक्षा त्या खऱ्या अर्थाने राजकारण स्वीकारतील का, आणि अजित पवारांनी निर्माण केलेली पोकळी भरून काढू शकतील का, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरतो. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच संदेशात त्यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून न्यायपूर्ण आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याची ग्वाही दिली आहे. अजित पवारांशिवायही राष्ट्रवादी काँग्रेस आपली स्वतंत्र ओळख राखेल, असा सूक्ष्म पण ठाम संदेश यातून दिला गेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments