Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूणमध्ये ३ फेब्रुवारीपासून ऋग्वेद संहिता स्वाहाकार

चिपळूणमध्ये ३ फेब्रुवारीपासून ऋग्वेद संहिता स्वाहाकार

 चिपळूण : येथील श्री फडके गुरुजी पुरोहित मंडळाच्या वतीने ३ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत वेदमूर्ती दिनकरशास्त्री जनार्दन फडके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा धार्मिक कार्यक्रम ठरवला असून तो श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. वेदशास्त्राचे शिक्षण देत अनेक विद्यार्थी घडवणारे वेदमूर्ती फडकेशास्त्री हे चिपळूणसह संपूर्ण कोकणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेकांना वेदाध्ययनात पारंगत केले. आपल्या निःस्पृह वृत्तीने त्यांनी समाजातील अनेक संस्था व व्यक्तींना मदतीचा हात दिला. गुरुजींची आपल्या विद्यार्थ्यांकडून ऋग्वेद संहिता स्वाहाकार व्हावा अशी इच्छा होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही यागही झाले होते. मात्र, १७ मे २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. तसेच नुकतेच १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला फडके यांचेही निधन झाले. गुरुजींची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा यज्ञ आयोजित केला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. यज्ञासाठी स्वेच्छेने सहकार्य करणाऱ्यांचे योगदान स्वीकारले जाईल, असेही कळवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात २ फेब्रुवारीला प्रायश्चित्तविधीने होईल. ३ फेब्रुवारीला गणेशपूजन, तर ४ फेब्रुवारीला अग्निमंथनाने स्वाहाकारास प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विधी होतील. ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पूर्णाहुती व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. अधिक माहितीसाठी हेमंत मोने गुरुजी 9960063603, विश्वास भिडे गुरुजी 8380962658 यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments