Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*डेरवण १२ व्या युथ गेम्ससाठी सज्ज; २७ फेब्रुवारीपासून स्पर्धांना प्रारंभ*

*डेरवण १२ व्या युथ गेम्ससाठी सज्ज; २७ फेब्रुवारीपासून स्पर्धांना प्रारंभ*

चिपळूण (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधत डेरवण येथे १२व्या डेरवण युथ गेम्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून २७ फेब्रुवारीपासून या भव्य क्रीडा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या अद्ययावत क्रीडासंकुलात या स्पर्धा पार पडणार आहेत. राज्यातील बालक व युवक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची मोठी संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव तसेच ज्येष्ठ क्रीडा संघटक चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. २७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण १९ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ आणि कॅरम यांसह कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब व योगा या देशी खेळांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याशिवाय फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांबरोबरच ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेला वॉल क्लाइम्बिंग हा साहसी खेळही या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. यंदा प्रथमच स्केटिंग या खेळाचा समावेश करण्यात आल्याने स्पर्धेचे आकर्षण आणखी वाढले आहे. भारतीय पारंपरिक खेळ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळांचा संगम असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सात हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ८ वर्षांखालील ते १८ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनीही सहभाग निश्चित केल्यामुळे प्रेक्षकांना चुरशीचे व दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.
विजेत्या खेळाडूंना पदके, करंडक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून एकूण १२०० पदके आणि ११५ करंडक स्पर्धेदरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. ही माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली असून, डेरवण युथ गेम्स ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता युवा पिढीमध्ये क्रीडासंस्कृती रुजवणारा मोठा उत्सव ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments