चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि क्रीडा संग्राम स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस येथील विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक तसेच माध्यमिक गटामध्ये घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा मान उंचावला आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे.
या स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये पार्थ निलेश कदम याने 200 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. नेहा संतोष मोरे हिने 200 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला, तर समीक्षा विनोद कदम हिने 100 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
सांघिक क्रीडा प्रकारांमध्येही आंबडस विद्यालयाच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. उच्च माध्यमिक मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले. उच्च माध्यमिक 4 × 100 मीटर रिले मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. याचबरोबर उच्च माध्यमिक मुलींच्या कबड्डी संघाने तृतीय क्रमांक तर उच्च माध्यमिक मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली. तसेच सह्याद्री क्रीडा संग्रामाच्या माध्यमिक गटात व्हॉलीबॉलमध्ये मुलांनी विजेतेपद पटकावत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सर, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम,मुख्याध्यापक वसंत यादव, शालेय समितीचे चेअरमन, समिती सदस्य ,पदाधिकारी व ग्रामस्थ , तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना शिक्षक गणेश सावर्डेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर प्रशिक्षक संतोष शिंदे व भास्कर महाडिक यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सह्याद्रि क्रीडासंग्रामात आंबडस विद्यालयाचे घवघवीत यश
RELATED ARTICLES



