चिपळूण : कोकणातील लोटे एम आय डी सी येथे आलेल्या महाविनाशकारी लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल विरोधात वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. दि.८ जानेवारी रोजी कंपनीविरोधात आयोजित करण्यात आलेला मोर्चा आणि निदर्शने याला विविध सामजिक संघटना, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी संघटना, मच्छीमार संघटना, मान्यवर सामाजिक, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, पक्षभेद विसरून सामाजिक कार्य करणारे विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
रविवार दि.४ जानेवारी रोजी भरत लब्ध्ये यांनी आयोजित केलेली यासंबंधी नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला प्रकाशबापू काणे, तुळशीराम पवार, शहानवाज शहा, अशोक भुस्कुटे, उदय घाग, सुमतीताई जामभेकर, सिद्धेश लाड, निर्मलाताई जाधव, रामशेठ रेडीज, दिनेश माटे, मुज्जफरभाई सय्यद, दादा आखाडे, सुनील खेडेकर, किशोर जागुष्टे, सखाराम गोरे, अजित शिंदे, प्रदीप घाडगे, यशवंत फके आदी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्प क्षेत्रातील असणाऱ्या सोंनगाव, कोतवली, लोटे, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, असगणी, शेलडी, चिरणी, भेलसई, लवेल, सवेनी, माणी, शिव, आयनी, मेटे, केळणे, आंबडस आदी गावांमधील अनेक सुजाण नागरिक आपले व आपल्या प्रियजनांचे भवितव्य अंधारात लोटणाऱ्या या प्रकल्पाविरोधात एकवटत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या आंदोलनात निर्भय बनो,पूज्य गांधी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण, सह्याद्री निसर्ग मित्र, संविधान संरक्षण समिती,कोकण बचाव समिती, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय सेवादल, अर्थ फाउंडेशन, कोशिश फाउंडेशन, कोकण सिरत कमिटी, समर्थ प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच,ग्रामीण विकास मंच, विविध मच्छीमार संस्था इत्यादी अनेक संस्थानी पाठिंबा व्यक्त केला असून त्यांचा प्रत्यक्ष सहभागही असणार असल्याचे भरत लब्ध्ये यांनी स्पष्ट केले. यावेळी आंदोलनाच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला.प्रकाश काणे यांनी हा प्रकल्प हद्दपार करण्याकरिता आवश्यक असल्यास सह्यांची मोहीम राबविण्यात यावी असे मत मांडले.शासनाची संशयास्पद भूमिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग मंत्रालय यांचेबाबतीतही यावेळी उपस्थितानी संताप व्यक्त केला.हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करण्यात आला. उदय घाग, तुळशीराम पवार, सुमतीताई जामभेकर, शहानवाज शहा, मुज्जफरभाई सय्यद आदींनी आपले मत मांडले.
*मान्यवरांचा पाठिंबा*
या आंदोलनात आ. भास्करराव जाधव, आ.शेखर निकम, मा.आ.विनय नातू तसेच सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्काताई महाजन, नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे डॉ.मंगेश सावंत, सत्यजित सावंत उपस्थित राहणार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख हुसेनभाई दलवाई यांनी कळविले आहे.
*लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधी संघर्ष नियोजनासाठी बैठक संपन्न*
RELATED ARTICLES



