चिपळूण (राज पिलके ) :
प्रवासात किंवा अन्य कारणांमुळे नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा गहाळ मोबाईल बाबत नागरिकांकडून पोलीस ठाण्यात अर्ज दाखल होत असून त्या अनुषंगाने चिपळूण पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलची नोंद ठेवण्यात येते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितिन बगाटे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) श्री. प्रकाश बेले तसेच पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांचे मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार/६२४ संतोष शिंदे व महिला पोलीस अंमलदार/२५४ वर्षा रहाटे यांनी गहाळ मोबाईलच्या नोंदींच्या आधारे विशेष प्रयत्न करून एकूण ४४ गहाळ मोबाईलचा शोध घेतला आहे.
सदर सापडलेले मोबाईल संबंधित मूळ मालकांची कागदपत्रे पडताळून मा. डी.वाय.एस.पी. श्री. प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते आज रोजी मोबाईल धारकांना सुपूर्द करण्यात आले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पोलीस हवालदार संतोष शिंदे व महिला पोलीस अंमलदार वर्षा रहाटे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यातील गहाळ मोबाईल रजिस्टरमधील नोंदींच्या आधारे आजपर्यंत एकूण ५८ मोबाईलचा यशस्वीपणे शोध घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल पीएसआय हारुगिरे व पीएसआय महामुने यांनी पोलीस हवालदार संतोष शिंदे व महिला पोलीस अंमलदार वर्षा रहाटे यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
चिपळूण पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून गहाळ मोबाईल बाबत नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.



