चिपळूण, (प्रतिनिधी) : यूसीओ बँकेने आपल्या ८४व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती येथे वृक्षारोपण मोहीम राबवली. या मोहिमेबाबत यूसीओ बँक व्यवस्थापक पीयूष मिढा माहिती देताना म्हणाले की, यूसीओ बँकेची स्थापना ६ जानेवारी १९४३ मध्ये कोलकाता येथे झाली. तेव्हापासून आतापर्यंत बँकेने वर्धापन दिनाच्या निमित्ताने नेहमीच विधायक उपक्रम राबवले आहेत. ग्राहकांचे हित जपून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे देशभरात बँकेचा विस्तार झाला. भावी पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे, या उदात्त हेतूने आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले आहे. बँकेच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यामुळे शालेय परिसर पर्यावरणीय जाणीवांनी भारावून गेला होता. कोकणात ही पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपल्याला जगण्यासाठी चांगल्या हवामानाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी, वृक्षांमुळे आपल्याला दुष्काळावरही मात करता येईल, असे व्यवस्थापक मिढा यांनी सांगितले. प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सतीच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड आणि ती जपण्याची ग्वाही दिली. शाळेच्या शिक्षकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
यूसीओ बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त खेर्डी चिंचघरी शाळेत वृक्षारोपण
RELATED ARTICLES



