चिपळूण : सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यातील खेर्डी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात महेश भास्कर म्हात्रे (रा. मु.पो. जिते, ता. पेण, जि. रायगड) याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.५३ वाजता नोंदविण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०), व्यवसाय शेती, रा. मु.पो. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महेश म्हात्रे याने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्ती म्हणून करून देत सरकारी खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन दिले. या आमिषाने फिर्यादी रसाळ यांच्याकडून ६ लाख रुपये तसेच इतर सात जणांकडून मिळून एकूण १८ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. मात्र कोणालाही सरकारी नोकरी न लावता घेतलेली एकूण २४ लाख २५ हजार रुपयांची रक्कम परत न करता आरोपीने सर्वांची फसवणूक केली.
त्याचबरोबर म्हात्रे याने नितीन रसाळ यांच्या नावावर जनता सहकारी बँक, शाखा चिपळूण व एच.डी.एफ.सी. बँक, शाखा चिपळूण येथे कर्ज प्रकरणे उघडून त्या कर्जाच्या आधारे ह्युंदाई कंपनीची अल्काझार चारचाकी, बुलेट दुचाकी तसेच दोन मोबाईल फोन खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कर्जाचे हप्ते आरोपीने मे २०२४ पासून भरलेले नसून, सध्या १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची कर्जरक्कम थकीत आहे. यामुळे फिर्यादी यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण झाली आहे.
दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे पैसे परत मागितले असता आरोपीने फोन क्रमांक ९३०९०३८७३९ वरून शिवीगाळ करत “तुझी वाट लावीन, तुझी बदनामी करीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून, सरकारी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.



