चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखांअंतर्गत कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले असून, ३० एप्रिल व १ मे २०२६ या कालावधीत ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहे. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था असून रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत एकूण सुमारे ५० शाखा कार्यरत आहेत. या शाखांमधून जवळपास २५८ पेक्षा अधिक कर्मचारी, ६५ पेक्षा अधिक अल्पबचत प्रतिनिधी, ४१ सराफ व १ हजार १०७ पेक्षा अधिक समन्वयक कार्यरत असून, सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या या कर्मचारी वर्गामुळे पतसंस्थेच्या लौकीकात दिवसेंदिवस भर पडत आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत असते. यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शाखाधिकारी व वसुली कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला जातो. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी चार पगार भेट म्हणून दिले जातात. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांच्या कार्यक्षमतेला आणि कलागुणांना वाव देण्याचे काम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सातत्याने करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१७ पासून शाखांतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी संस्थेच्या सात विभागांतील शाखांमधील कर्मचारी संघांमध्ये ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे.
याशिवाय कर्मचारी संघ विरुद्ध संचालक मंडळ संघ असा लक्षवेधी सामना देखील आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून, सामने प्रकाशझोतात रात्री १० वाजेपर्यंत रंगणार आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार असून उत्कृष्ट खेळाडूंनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. संस्थेच्या या नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रमास कर्मचारी, क्रीडारसिक तसेच संस्थेचे सभासद व चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
*चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था कर्मचाऱ्यांचा रंगणार क्रीडामहोत्सव!* *३० एप्रिल व १ मे रोजी पवन तलाव मैदानावर प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा* *पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते होणार शुभारंभ*
RELATED ARTICLES



