धारावीच्या परीक्षेत शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण पास
शिवसेनेच्या भास्कर शेट्टींचा दणदणीत विजय
चिपळूण (राज पिलके ) – मुस्लिम, दक्षिण भारतीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराची जबाबदारी घेणं म्हणजे एक कठीण परीक्षाच होती. मात्र ही जबाबदारी समर्थपणे पेलून शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण आज धारावीच्या परीक्षेत पास झाले. येथील प्रभाग क्रमांक १८८ मधून शिवसेनेच्या भास्कर अण्णा शेट्टी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात सदानंद चव्हाण यांचे योगदान मोलाचे ठरले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी सांभाळण्यासाठी मुंबईच्या धारावीतील १८७ आणि १८८ या दोन प्रभागात सदानंद चव्हाण यांनी आठवडाभर तळ ठोकला होता. पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे हे देखील या प्रचार दौऱ्यात त्यांच्यासोबत होते. प्रभागातील मराठी भाषिक मतदारांशी थेट संवाद साधत श्री.चव्हाण यांनी केलेला प्रचार आज शेट्टींचा विजय सोपा करून गेला.
प्रभाग १८७ मध्ये वकील शेख यांच्यासाठी देखील सदानंद चव्हाण यांनी खूप परिश्रम घेतले होते. मात्र प्रमुख तिरंगी लढतीमध्ये झालेल्या मत विभाजनामुळे शेख यांचा पराभव झाला.
प्रभाग क्रमांक १८८ मध्ये मुस्लिम आणि दक्षिण भारतीय मतदारांच्या तुलनेत मराठी मतदार कमी आहेत. येथील कोकणी वस्तीत जाऊन सदानंद चव्हाण यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. कुठेही भाषणबाजी न करता थेट संवाद साधून श्री.चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केले होते. कोकणातील आमदार प्रचारासाठी आल्याने मतदारांमध्ये देखील उत्साह दिसत होता. ठिकठिकाणी श्री.चव्हाण यांचे स्वागत देखील होत होते. या ठिकाणी प्रचारात मिळणारा मतदारांचा प्रतिसाद शेट्टी यांच्या विजयाची खात्री देत होता. या प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सदानंद चव्हाण यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या. शाखाप्रमुख किशोर मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या सूचना अंमलात आणल्याने निवडणूक जिंकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची भावना आज विजयानंतर समन्वयक विश्वजीत पराशर यांनी सदानंद चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केली. चिपळूण वरून येऊन प्रचारात मोलाची कामगिरी पार पाडल्याबद्दल विजयी उमेदवार भास्कर अण्णा शेट्टी यांनी देखील सदानंद चव्हाण यांचे आवर्जून आभार मानले.
प्रभाग क्रमांक १८७ मध्ये शाहू नगर, कमला नगर या भागातील मराठी मतदारांवर सदानंद चव्हाण यांनी लक्ष केंद्रित केले होते. येथील मराठी मतदारांना वकील शेख यांच्या विजयाची हॅटट्रिक करण्याची विनंती श्री.चव्हाण यांनी केली होती मात्र आयत्यावेळी बदललेल्या मतदारसंघात अवधी कमी मिळाल्याने शेख यांना अपयश आले. निकालानंतर या प्रभागाचे शाखाप्रमुख आनंद पिल्ले तसेच प्रभागाचे समन्वयक विश्वजीत पराशर यांनी सदानंद चव्हाण यांचे आभार मानले. चिपळूण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील श्री.चव्हाण यांचे अभिनंदन केले.



